ठाणे : भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील वर्धमान कंपाउंड मधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. घटनास्थळी दुसऱ्या दिवशीही म्हणजे आतापर्यत ३२ तास उलटून गेलीत तरी मदतकार्य सुरूच असून या दुर्घटनेत आतापर्यत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी दोन जण अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात इमारत मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. इंद्रपाल गुरुनाथ पाटील असे अटक केलेल्या इमारत मालकाचं नाव आहे.
इमारत मालकाला अटक :कमकुवत इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकाने लक्षात घेतलेली नसल्याने हि इमारत कोसळल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात इमारत मालक इंद्रपाल पाटील याच्या विरोधात भादवी कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज अटक करण्यात आली आहे. दुर्घटना ग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी दोन जण अडकल्याचे सांगण्यात आले. या दोघांचा शोध लागल्यानंतरच टीडीआरएफ आणि एनडीआरएफ जवानांचे मदतकार्य संपल्याचे जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
बेकायदा बांधकामे :विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टा असलेल्या ६१ गावांचा एमएमआर रिजनमध्ये १० ते १२ वर्षांपूर्वी समावेश करण्यात आला. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायतकडे बांधकाम परवानगी तेव्हापासून एमएमआरडीए प्रशासनानं बंद केल्या. तसेच बांधकाम परवानग्या एमएमआरडीए विभागाच्या नगररचना विभागाकडून बांधकाम विकासकाला घेणे बंधनकारक असूनही बहुतांश गावात आजही बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. गेल्या १० वर्षात हजरो इमारतीसह गोदामे बेकायदा बांधकाम करण्यात आल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी होऊन एमएमआरडीए, भिवंडी तहसीलदार यांना हजरो बेकायदा इमारती व गोदामांना निष्कासित करण्याचे आदेश दिले होते. सुरवातीला भिवंडी तालुक्यातील एमएमआर झोन मधील शोकडो इमारतीसह गोदामावर तहसीलदार कार्यलयच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या काळापासून ही कारवाई थंड पडल्याने भूमाफियांचे फावल्याचे दिसून येत आहे. एकदंरीतच एकादी इमारत कोसळल्यानंतर हा मुद्दा पुन्हा समोर येतो हेही विशेष आहे.
मदत कार्य सुरुच : दुर्घटनेला ३२ तास उलटून गेली तरीही घटनास्थळी टीडीआरएफ, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे पथक मदत कार्य करीत आहेत. आतापर्यत इमारतीचा अर्ध्याहून अधिक ढिगारा जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला आहे. संपूर्ण शोध कार्य संपण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर नवनाथ सावंत (वय,४०) लक्ष्मीदेवी रवी म्हातो (वय,२६ ) श्रीमती .सोना मुकेश कोरी (वय ,४५ ) सुधाकर गवई ( वय,३४ ) प्रवीण (प्रमोद) चौधरी (वय , २२) त्रिवेणी यादव (वय ४०) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याची नावे आहेत. तर जखमिंची नावे , सोनाली परमेश्वर कांबळे वय २२ , शिवकुमार परमेश्वर कांबळे वय (अडीच वर्षे), मुख्तार रोशन मंसुरी वय २६, चींकु रवी महतो ३ वर्ष, प्रिन्स रवी महतो वय ५ वर्ष, विकासकुमार मुकेश रावल वय १८ वर्ष, उदयभान मुनीराम यादव वय २९, अनिता वय ३०, उज्वला कांबळे वय ३०, सुनिल पिसाळ वय ४२
हेही वाचा - Labour Day 2023 : काय आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा उद्देश, वाचा सविस्तर