ठाणे -शहरातील एका 4 मजली इमारतीला तडे गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ती इमारत रिकामी करण्यात आले. ही इमारत खोपट परिसरातील गोकुळदास वाडीमध्ये आहे. 'साई आनंद' असे या इमारतीचे नाव आहे.
साई आनंद इमारत 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. या इमारतीच्या भिंती आणि पिलर्सला तडे गेल्याने ती धोकादायक झाली होती. यामुळे बाजूच्या चाळीलाही धोका निर्माण झाला होता. यानंतर याठिकाणी पालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने पाहाणी केली. मुंबईतही गुरुवारी इमारत दुर्घटना घडली. मुंबईत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदाचीचा उपाय म्हणून ही इमारत आणि शेजारी असलेली चाळ रिकामी केली. तसेच यातील नागरिकांना बाजूच्या पालिकेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था केली.
हेही वाचा-भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या उंबरठ्यावर; पाहा देशातील आढावा...
ठाण्यात आतापर्यंत पावसात अनेक इमारती पडून शेकडो लोकांचा बळी गेला आहे. तरीही नागरिक पर्याय नसल्याने आपला जीव मुठीत घेऊन अशा धोकादायक इमारतीत राहत आहेत. पावसाळा आणि जोरदार पाऊस आला की धोकादायक इमारतीचा विषय पुन्हा ऐरणीवर येत असतो. पालिका प्रशासन दरवर्षी अनेक इमारती रिकाम्या करते तर काही इमारती पाडण्याचेही काम करत असते. यावर्षीही पालिका प्रशासन अशा धोकादायक इमारती पाडण्याचे काम करणार आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
दरम्यान, मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील येथील भगतसिंग मार्गावरील एका इमारतीचा भाग कोसळला होता. ही घटना गुरुवारी घडली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. तर 23 जणांची सुटका करण्यात आली. घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धठ ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.