ठाणे- एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या भागीदारांनी मिळून रहिवाशांना कॉर्पस फंडाच्या नावाने साडे पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील मोहन सबरविया या हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या रहिवाशांनी मोफा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या बांधकाम विकासकांवर गुन्हा दाखल केला आहे.
जितेंद्र मोहनदास लालचंदानी, अमित गांधी, दीपक मनचंदासह इतर भागीदार आणि मोहन लाईफ स्पसेस एलएलपी कंपनीचे भागीदार, अशी कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहरात २०१६ मध्ये मोहन सबर्बिया या नावाने हायप्रोफाईल गृह संकूल उभारण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी येथील सदनिकाधारकांना सर्व सुख सुविधेचे आमिष दाखवून त्यांना घरे विकली. मात्र, सांगितल्याप्रमाणे सुख सुविधा देण्यात आल्या नाही. शिवाय कॉर्पस फंडाच्या नावाने रहिवाशांकडून ५ कोटी ६१ लाख ५ हजार रुपये आरोपींनी गोळा केली आणि त्या रक्कमेचा परस्पर अपहार केला.