नवी मुंबई- शहरात गुरुवारी दुपारी एका बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेदरम्यान आणखी एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घणसोली सेक्टर 21 तळवली येथे ही घटना घडली, प्रविण तायडे (36) असे हत्या झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे नवी मुंबई शहर हादरले आहे.
नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळी झाडून हत्या गुरुवारी दुपारी बांधकाम व्यावसायिक प्रविण तायडे हा त्याच्या एका मित्रासोबत मोटारसायकल वरून घणसोली सेक्टर 21 येथे जात होता. यावेळी त्यांच्या मोटार सायकलच्या मागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर मारेकऱ्यांपैकी एकाने तायडे यांच्यावर गोळीबार केला. त्यामधील एक गोळी त्यांच्या डोक्याला लागल्याने तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य एक गोळी तायडे यांच्या मित्रालाही लागली आहे. त्यामुळे तोही जखमी झाला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीण कुमार पाटील परिमंडळ 1 उपायुक्त पंकज डहाणे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत, या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे याचा शोध घेण्यासाठी तायडे यांच्या संपर्कातील व्यक्तींकडे पोलीस चौकशी करत आहेत.
बांधकामाची साईट मिळवण्यावरून हत्या?
तळवली याठिकाणी हत्या झालेल्या ठिकाणी मृत तायडे यांचे बांधकामाचे काम सुरू आहे. मुख्य व्यावसायिकांकडून कामे घेऊन प्रवीण तायडे हे बांधकाम करायचे. बांधकामाची साईट मिळण्यावरून मृत प्रविण तायडे व इतर बांधकाम व्यावसायिकांमध्ये चढाओढ सुरू होती तसेच त्याचे घणसोली सेक्टर 21 तळवली मधील भूखंड विकसित करण्यासंदर्भात इतर बांधकाम व्यावसायिकांशी वादही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातूनच गुरुवारी दुपारी प्रवीण तायडे याची हत्या झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.