ठाणे- ठाण्यातील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनीत मंगळवारी रात्री एका बांधकाम व्यावसायिकावर टोळक्याने लोखंडी रॉडने हल्ला केला. यात व्यावसायिक जखमी झाला आहे. ऋषिकेश दंडे (वय 32 रा.ऐरोली) असे जखमी व्यवसायिकाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा-'कोरोना तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही', आरोग्य विभागाचा खुलासा
नवी मुंबईत राहणारे ऋषिकेश दंडे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे ठाण्यातील नौपाडा भास्कर कॉलनीत कार्यालय आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते एकटेच कार्यालयात होते. दरम्यान, अचानक आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच त्यांना धमकावत मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान, ऋषीकेशने आरडाओरडा केल्याने इमारतीचा सुरक्षारक्षक धावून आल्याने हल्लेखोरांनी धूम ठोकली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात नागरीकरण वाढत असल्याने बिल्डर लॉबीमध्ये व्यावसायिक चढाओढ वाढली आहे. त्यातूनच असे प्रकार वाढत असल्याची चर्चा रंगली आहे.