ठाणे- भिवंडीसाठी नवखे असलेले व मतदारसंघात स्वतःचे एक मत नसणारे मुंबई, भायखळ्याचे समाजवादीचे नगरसेवक रईस कलाम शेख अवघ्या १२ दिवसाच्या प्रचारात आमदारकी मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. ही किमया फक्त भिवंडी पूर्व मतदारसंघात घडू शकते हे विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ येथे मुस्लिम बहुल अल्पसंख्यांक मतांचा भरणा असून यामध्ये मुस्लिम मते ६० टक्के तर हिंदू व अन्य मिळून ४० टक्के मते आहे. हा मतादारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात अल्पसंख्यांक मतांच्या विभाजनाचा फायदा घेत २०१० ची पोटनिवडणूक व २०१४ ची विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निसटता विजय संपादन करून आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र, या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षता व विकासाचा मुद्दा बाजूला सारून कट्टर धर्मकारण पुढे करून समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा आपले पाय रोवले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य असतानाही संतोष शेट्टी यांना पराभव पत्कारावा लागला आहे.
भिवंडी पूर्व मतदारसंघात एकूण मतदान २ लाख ६९ हजार ९३५ एवढे असून त्यापैकी या निवडणुकीत १ लाख २७ हजार ९१३ मतदान झाले होते. यामध्ये मुस्लिम मते ६० टक्के तर हिंदू व अन्य ४० टक्के मते होती. मात्र यामध्ये संतोष शेट्टी यांची तेलुगू व्होट बँक ही ३० हजारांपेक्षा अधिक आहे. असे असताना धार्मिक ध्रुवीकरणामुळे त्यांच्या पारड्यात मुस्लिम मतदारांनी पुरती पाठ फिरवली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे.