ठाणे:पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तौसिफ मनीन बागवान उर्फ बेब्बो हा तृतीयपंथी भिवंडी शहरातील नविबस्ती परिसरात असलेल्या एका घरात गेल्या काही महिन्यांपासून राहत होता. आरोपी मोहम्मद कामील जमील अन्सारी हा त्या तृतीयपंथीयासोबत लाहोटी कंपाउंड भागातील एका खोलीत अनैसर्गिक संबंध ठेवत होता. त्यातच ३० एप्रिल रोजी रविवारी मध्यरात्री त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी अन्सारीने तृतीयपंथी तौसिफवर हल्ला चढविला. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तृतीयपंथीयाचा जागेवरच मृत्यू झाला.
आरोपीस अटक: या घटनेनंतर शहरातील असंख्य तृतीयपंथीय भिवंडी शहर पोलीस ठाण्याबाहेर एकत्रित आले. त्यांनी आरोपीस अटक करण्याची मागणी लावून धरली होती. यावर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी आरोपीला तातडीने पकडण्याचे पोलीस पथकास आदेश दिले. यानंतर पोलिसांनी आरोपी मोहम्मद कामील जमील अन्सारी याला भिवंडी परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला आज अटक करण्यात आली आहे.
सांगलीत तृतीयपंथीयाची हत्या: सांगली जिल्ह्यातील मिरजेत 18 सप्टेंबर, 2019 रोजी एका तृतीयपंथीयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून तृतीय पंथीयाचा खून करण्यात आला होता. गौस रज्जाक शेख उर्फ काजल असे मृत तृतीय पंथीयाचे नाव होते. या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेनंतर जखमी अवस्थेत आढळलेल्या शेख यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.