ठाणे: वहिनीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील शहाड भागातील एका कॉलनीमध्ये घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सख्ख्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
वहिनी-दीराचे चोरीछुपे संबंध: पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी हे अंबरनाथ शहरात एकत्र राहत होते. दोघेही सख्ये भाऊ असून दोघांचा विवाह झाला आहे. मृत मोठा भाऊ रोहितने आरोपी लहान भावाच्या पत्नीशी जवळीक साधून तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी दोघांना अनैतिक संबंध प्रस्थापित करताना मृतकच्या पत्नीने पाहिले होते. तेव्हापासूनच दोघा भावात वाद सुरू झाले. त्यानंतर काही नातेवाईकांनी मध्यस्थी करत प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही मृत मोठा भाऊ चोरीछुपे संबंध करीत असल्याचे आरोपी भावाला समजले होते.
भांडण आणि हत्या:त्यातच उल्हासनगर शहरातील शहाड फाटक परिसरात छत्रपती शाहू महाराज कॉलनीत राहणाऱ्या आजीकडे मृतक रोहित शुक्रवारी (आज) दुपारच्या सुमारास आला होता. त्यावेळी आजीच्या घरातच आरोपी अमित आणि मृतक रोहित या दोघा भावांमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर मृतक रोहित आजीच्या घरात झोपला होता. यावेळी आरोपी भाऊ अमितने झोपलेल्या रोहितचा खून केला.
गुन्हा दाखल: घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत पंचनामा केला. रोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना करत पोलिसांनी आरोपी अमितला ताब्यात घेतले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून अमितला अटक केली आहे. उद्या २५ फेब्रुवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे.
शिवीगाळ केल्याने हत्या: शिवीगाळ करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाची दोन मित्रांनी मिळून 21 फेब्रुवारी, 2023 रोजी धारधार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना उल्हासनगर शहरातील बालकंजी बारी शाळेजवळ घडली होती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक पोलीस आणि उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास करून दोन्ही आरोपींना १२ तासातच बेड्या ठोकल्या होत्या. पप्पू उर्फ पपडया जालीदंर जाधव (वय ३६ रा. बालकंची बारी, खेमानीरोड, उल्हासनगर) अमित रमेश पांडे (वय ३० रा. महालक्ष्मी प्लॉस्टजेट कंपनी, अंबरनाथ ) असे अटक केलेल्या आरोपीची नावे होती. तर अशोक शामराव वाघमारे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते.
धारधार शस्त्राने हल्ला: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मृतकमध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून शिवीगाळ झाली होती. याचा राग मनात धरून आरोपीने अशोकला मारण्याचा कट रचला होता. त्यातच महाशिवरात्रीला रात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागातील बालकंजी बारी शाळेजवळ ही घटना घडली. तिथे अशोक वाघमारे हा उभा असतानाच दोघा आरोपींनी अचानक येऊन त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यातच अशोक वाघमारे यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते.
हेही वाचा:Pakistan Economic Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, काश्मिरी नेते आणि कार्यकर्ते झाले सैरभैर, वाचा स्पेशल रिपोर्ट