ठाणे -डोंबिवलीच्या पूर्व -पश्चिमेला जोडणाऱ्या कोपरी पुलाचे काम करण्यासाठी ठेकेदार मिळत नसल्याने शहर वाहतूक पोलीसदेखील त्रस्त झाले आहेत. केडीएमसीने डिसेंबरमध्ये या पुलाच्या दुरुस्तीसाटी निविदा देखील मागवल्या होत्या. त्यामुळे कोपरी पुलाच्या दुरुस्तीचे काम जूनअखेर पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. हा पूल वाहतुकीला बंद करून आठ महिने उलटले आहेत. त्यातच अजून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे कोपरी पुलाच्या दुरुस्तीचे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने कोणी 'ठेकेदार देता का ठेकेदार' असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर येऊन ठेपली असल्याचे दिसून येत आहे.
डोंबिवलीच्या कोपरी पुलाच्या कामासाठी ठेकेदार मिळेना; पूल आठ महिन्यापासून बंद दुसरीकडे पुलाचे काम सुरू करण्यात येत नसल्याने शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी २० वॉर्डन पुन्हा द्यावे, असे पत्र वाहतूक नियंत्रण विभागाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पाठवले आहे. डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे पुलाचे काम रखडल्यास नागरिकांमध्ये प्रक्षोभ होण्याची भीती वाहतूक पोलीस व्यक्त करत आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोपरी पूल बांधण्यासाठी डिसेंबरमध्ये निविदा काढली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने दुसरी निविदा काढण्यात आली. या पुलाचे काम वेगळ्या पद्धतीचे असून पूल तोडून नवीन पूल बांधायचा आहे. मात्र, त्यासाठी रेल्वेचे ब्लॉक मिळणे अवघड आहेत. शिवाय ठेकेदार पुढे येण्यास तयार नाहीत. धोकादायक झालेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे सेफ्टी कमिशनची परवानगी वगळता रेल्वेच्या सर्व मंजुऱ्या मिळाल्या आहेत. त्यातच अजून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे कोपरी पुलाच्या दुरुस्तीचे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. पाडकाम करण्यासाठी रेल्वेचे तब्बल २८ तर, नवीन बांधकाम करण्यासाठी किमान ४ असे एकूण ३२ ब्लॉक घ्यावे लागणार आहेत. याच दुरुस्तीच्या कामांतर्गत राजाजी पथवरील पुलाची पुलाची नव्याने उभारणी, महावितरणच्या केबल शिफ्टिंग व पुलावरील इले्ट्रिरकल कामे करण्यात येणार आहे. मात्र, पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी मागविलेल्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा निविदा मागवाव्या लागल्या आहेत. पुलाच्या कामासाठी सुमारे ९ कोटी रुपयांची निविदा मागवण्यात आली होती. तथापि त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एकीकडे पुलाचे काम रखडण्याची भीती व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे एखाद्या दिवशी जनप्रक्षोभ होण्याचीही भीती पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरी पूल गेले ७/८ महिने वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे डोंबिवलीकर वाहतूक कोंडीमुळे प्रचंड त्रस्त आहेत. पुलाचे काम रखडल्याने वाहतूक नियंत्रण विभागातील पोलीसही कमालीचे त्रस्त आहेत. कोपरी पूल काम रखडल्याने केडीएमसीने वाहतूक सुरू असणाऱ्या रस्त्यावरील अडथळे दूर करावे, फेरीवाले हटवण्यात यावेत, अशा सूचना वाहतूक विभागाने केल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहर वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रण करण्यासाठी २० वॉर्डन दिले होते. मात्र, ते पुन्हा द्यावेत, असे पत्र पालिकेला पाठवल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सतेज जाधव यांनी सांगितले. वाहतूक विभागाकडे अपुरे कर्मचारी असून त्यांच्यावर कामाचा ताण आहे, याकडे पोलीस निरीक्षक जाधव यांनी लक्ष वेधले.