ठाणे :महानगरपालिकेत खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा तक्रारदार हा कल्याण पूर्वेकडील होम बाबा टेकडी येथे कार्यरत होता. या खाजगी सुरक्षा रक्षकाकडून लाचखोर भरत बुळे याने महिन्याला दोन हजार रुपयाची मागणी केली होती. त्यातच पैशांसाठी लाचखोर बुळे हा तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ( शनिवारी) महानगरपालिकेत सापळा रचला असता भरत बुळे याला दोन हजारातील एक हजार रुपयाची रक्कम घेताना पथकाने रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे पालिका स्थापनेपासून म्हणजे मागील 39 वर्षांत 42 लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यातच कोरोनाच्या काळातचही लाचखोरीचे प्रकरण समोर आले होते.
लाचखोरांच्या यादीत अतिरिक्त आयुक्तही :महापालिकेचा पहिला लाचखोर म्हणून अनधिकृत बांधकाम विभागात (सुपरवायझर) असलेल्या तुकाराम संख्ये ठरला. त्याला एप्रिल १९९५ साली १ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लाचखोरीला सुरुवात होवून आजपर्यंत 42 लाचखोरांना अटक करण्यात आली. या लाचखोरांच्या यादीत अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांचाही समावेश झाला. १३ जुलै २०१८ रोजी अनधिकृत बांधकाम कारवाई न करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
लाचेच्या स्वरूपात महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी :धक्कादायक बाब म्हणजे 'क' प्रभागातील रमेश राजपूत नावाच्या लिपिकाने चक्क लाचेच्या स्वरूपात एका महिलेला शारीरिक सुखाची मागणी केल्याने उघड झाले होते. मात्र पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेना व भाजप युतीच्या धोरणामुळे कायद्याची पळवाटा काढून ३५ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीमध्ये येण्याची संधी देण्यात आल्याचे दिसून आले. तसेच आजही डझनभर लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे.