महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडून लाच; वैद्यकीय अधीक्षकाला जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाठवली नोटीस - indira gandhi hospital dean

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडून लाच स्वीकारल्या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकाला जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीस पाठवली आहे. भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला.

indira gandhi hospital, bhiwandi
स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय

By

Published : Sep 29, 2020, 3:51 PM IST

ठाणे - भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडून लाच प्रकरणात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकाला जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. यामुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या नोटिशीत रुग्णांना सेवा देण्याच्या कामात हलगर्जीपणा, भष्टाचार आणि गैरकारभार रुग्णालयात सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भिवंडीत राहणारी जैनब इनामदार या गर्भवती महिलेला 12 सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमाराला प्रसूतीवेदना होत असल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी याठिकाणी कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी या गर्भवती महिलेकडून प्रसूतीसाठी लाच स्वरुपात पैशांची मागणी केली होती. मात्र, ही महिला त्यांची मागणी पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी या महिलेकडे दुर्लक्ष करून तिच्यासोबत आलेल्या महिलेकडून तिची प्रसूती करून घेतली. त्यांनतर पैशाची मागणी पूर्ण करू न शकल्याने तिला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगीही नाकारली, असा आरोप भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांनी करीत यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली होती.

या लेखी तक्रारीची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी गंभीर दखल घेत, स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांना नोटीस बजावून 12 तासांच्या आत या नोटीसचा खुलासा करावा. तसेच याप्रकरणी तातडीने चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात सादर करावा, असेही नमूद केले आहे.

दरम्यान, याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता मी त्यावेळी कोविडने आजारी असल्याने रुग्णालयात उपस्थित नव्हतो. आजच रुग्णालयात आलो आहे. माझ्या ठिकाणी दुसऱ्या डॉक्टरांना चार्ज दिला होता. विशेष म्हणजे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ठाण्यातील एका राय नावाच्या ठेकेदाराला कंत्राटी पद्धतीवर प्रसूती गृहाचा ठेका देण्यात आला. आम्हाला जिल्हा शल्यचिकित्सक यांची नोटीस प्राप्त होताच संबधित ठेकेदाराला तातडीने नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी याप्रकरणातील दोन कर्मचारी महिलांना निलंबित केले असल्याची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details