ठाणे -प्रेयसी घरात एकटीच असल्याची संधी साधून प्रियकराने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रेयसीने आरडा ओरड केल्याने तिच्या मावस भावासह शेजारच्यांनी तिच्याकडे धाव घेऊन तिची सुटका केली आणि संबंधित प्रियकराला जबरदस्त चोप दिला. यानंतर पीडित तरुणीच्या तक्ररारीवरून प्रियकरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना भिवंडीतील तेली चाळ, महाराजा हॉटेल (कांबे) येथे घडली आहे. शिवानंद करिअप्पा चलवादी (वय ३०, रा. अमडीहाल, लिंगडपूर, कर्नाटक) असे बेदम मारहाण केलेल्या प्रियकराचे नाव आहे. निजामपुरा पोलीस ठाण्यात प्रियकराला मारहाण करणाऱ्या चौघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवानंद याचे मुंबईतील ३० वर्षीय केअर टेकर आसलेल्या तरुणीशी मोबाईल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले होते. सदर तरुणी भिवंडीत मावशीकडे पाहुणी म्हणून आली होती. तिचा माग काढत शिवानंद तिला भेटण्यासाठी आला होता. काल रात्री ती एकटीच घरात असल्याची संधी साधून त्याने दरवाजाची कडी लावून तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिडीत तरुणीने आरडा ओरड केली असता तिचा आवाज ऐकून मावस भाऊ सुनिल इंगळे (२८) हा अन्य शेजाऱ्यांसह तिच्या सुटकेसाठी धावून आला.
यावेळी पीडित तरुणीने प्रियकराच्या आगळीकी विषयी माहिती दिल्याने संतप्त झालेल्या सुनील इंगळे व शेजाऱ्यांनी प्रियकर शिवानंद यास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेप्रकरणी पीडित तरुणीचा मावस भाऊ सुनिल इंगळे याच्यासह अन्य तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार प्रियकर शिवानंद याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वंदना गुळवे करीत आहेत.