महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात बिबट्याचा बालकावर हल्ला; मोठ्या भावाने धाडसाने वाचवला लहान भावाचा जीव

शेतात करवंद शोधणाऱ्या चिमुकल्या भावावर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे मोठ्या भावाने दगड आणि काठीने बिबट्याला पिटाळून लावले. चिमुकल्याची आजीही कोयता घेऊन बिबट्यावर धाऊन आल्याने बिबट्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

चिमुकल्यांचा सत्कार करताना पोलीस

By

Published : Jun 17, 2019, 10:15 AM IST

Updated : Jun 17, 2019, 11:07 AM IST

ठाणे- करवंदाच्या शोधात फिरणाऱ्या लहान भावावर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे जवळच असलेल्या मोठ्या भावाने बिबट्यावर दगड आणि काठीने जोरदार प्रहार करत लहान भावाचा जीव वाचवला. ही घटना मुरबाड तालुक्यातील करपटवाडीत घडली. नरेश काळूराम भला ( वय 14 ) तर हर्षद विठ्ठल भला ( वय 6 ) असे त्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भावांची नावे आहेत.

घटनास्थळासह नरेश आणि हर्षद


टोकावडे परिसरातील झाडघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या करपटवाडीत नरेश आणि हर्षद हे आजीसह शेतात भात पेरणीसाठी गेले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे दोघे करवंद शोधत शेताच्या बांधावर गेले होते. यावेळी करवंदाच्या जाळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षदवर हल्ला केला. बिबट्याने अचानक हल्ला केल्याने जवळच असलेल्या नरेशने आरडाओरडा करत बिबट्यावर दगड आणि काठीने वार केले. जवळच असलेली आजी कान्हीबाईही कोयता घेऊन बिबट्यावर धाऊन आली. लगतच्या शेतातून कामगारही धावत आले. त्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरुन पळ काढला.


बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही भावांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुरबाड शहरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोन्ही मुले भयभीत झाले असून त्यांच्या अंगावर डोक्यावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. टोकावडे विभागाचे वनपाल कपिल पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.


वनविभागाने बिबट्याची शोधमोहीम सुरू केली असता, सदर बिबट्या घटनास्थळाच्या काही अंतरावर मृत अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या मादी असून त्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात नेण्यात आला. त्यानंतर डॉ. प्रशांत गाढवे आणि डॉ. शैलेश पेठे यांनी बिबट्याला कोणतीही इजा झाली नसून त्याचा मृत्यू म्हातारपणामुळे झाल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान टोकावडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुहास खारमते यांनी लहान भावाचा जीव वाचवणाऱ्या नरेश काळूराम भलाचे कौतुक केले आहे. नरेशने मोठे धाडस दाखवल्यामुळेच हर्षदचा जीव वाचू शकला असे गौरद्गार त्यांनी काढले.

Last Updated : Jun 17, 2019, 11:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details