महाराष्ट्र

maharashtra

कल्याणमध्ये नियमानुसार शालेय साहित्य न दिल्याने चक्क चड्डी बनियन वर मुलगा शाळेत

By

Published : Jun 19, 2019, 9:00 AM IST

शालेय साहित्य देण्यास शाळेने असमर्थता दर्शवल्याने मुलाला चड्डी बनियनवर शाळेत घेऊन गेल्याचे कल्याण पूर्वेतील एका पालकाने सांगितले.

कल्याणमध्ये नियमानुसार शालेय साहित्य न दिल्याने चक्क चड्डी बनियन वर मुलगा शाळेत

ठाणे- खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशित मुलांना शिक्षण व शैक्षणिक साहित्य मोफत देणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही शाळा बिनदिक्कत पालकांनाच गणवेश व शालेय साहित्य खरेदी करण्यास सांगत असल्याने पालकवर्गाने संताप व्यक्त केला आहे. याबाबत कल्याण पूर्वेत एका पालकाने पाल्याला चक्क चड्डी बनियन वर शाळेत नेऊन निषेध नोंदवला. तर, पालिका मुख्यालतात देखील सुमारे 50 ते 60 पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत शिक्षणाचा हक्क डावलणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.


शासनाकडून गरीब गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये नियम २०१२ प्रमाणे नियमावली तयार करण्यात आली आहे. यात अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी २५ टक्के पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक केले आहे. मात्र, कल्याण डोंबिवलीतील बहुतांश शाळांकडून या कायद्याची पायमल्ली होत आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशित मुलांना शिक्षण व शैक्षणिक साहित्य मोफत देणे बंधनकारक असतानाही काही शाळा शैक्षणिक साहित्य मोफत देण्यास असमर्थता दाखवत असून पैशांची मागणी करत आहेत. कल्याण पश्चिममधील काही प्रसिद्ध शाळांमधील हा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

50 ते 60 पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत शिक्षणाचा हक्क डावलणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

आरोग्य शिक्षण मंचचे नितीन धुळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ५० ते ६० पालकांनी पालिका मुख्यालयातील शिक्षण मंडळ कार्यलयात येऊन शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी या पालकांनी काही शाळांमध्ये एडमिशन दिल्यानंतर पैशांची मागणी केली. तर काही शाळांमध्ये शालेय साहित्य बाहेरून विकत घेण्यास सांगितले. शासनाच्या आदेशाला जर या शाळा जुमानत नसतील तर अशा शाळांना समज द्यावी किंवा कारवाई करावी अशी मागणी पालकवर्गाने केली. तर शिक्षणाधिकारी जे. जे. तडवी यांनी पालकांच्या तक्रारी वाढल्यामुळे याप्रकरणी सर्व आरटीईच्या मुख्याध्यापकाची तातडीची बैठक बोलावून त्यांना आरटीई नियमाची अमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.

दुसरीकडे कल्याण पूर्व सूचक नाका येथे राहणारे रिक्षा चालक मनोज वाघमारे यांनी आपल्या ५ वर्षांच्या मुलासाठी कल्याण पूर्व येथील आनंद ग्लोबल लोकधारा या शाळेमध्ये आरटीई अंतर्गत पहिलीमध्ये प्रवेश घेतला. मात्र, शाळेसाठी लागणारी पुस्तके, गणवेश आणि इतर साहित्य हे सरकारी नियमानुसार देण्यासाठी शाळा टाळा-टाळ करत असल्याचा आरोप केला. याबाबत वाघमारे यांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क म्हणजेच RTE अंतर्गत आपल्या मुलाला प्रवेश मिळाला. मात्र, माझ्या मुलाला कायद्यानुसार गणवेश व शालेय साहित्य मिळाले नाही, याबाबत शाळा प्रशासन, शिक्षण मंडळाला निवेदन दिले. मात्र, शालेय साहित्य देण्यास शाळेने असमर्थता दर्शवल्याने मुलाला चड्डी बनियनवर शाळेत घेऊन गेल्याचे सांगितले. दरम्यान याप्रकरणी शाळा प्रशासनाचे प्रभारी मुख्याध्यापक (प्राथमिक) सुनील मोगरे यांनी नियमाप्रमाणे शालेय साहित्य शाळा प्रशासनाकडून दिले जाईल असे सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details