नवी मुंबई - शहरातील शिरवणे एमआयडीसीमधील अँटोबर्ग कंपनीतील एक नव्हे तर तब्बल 350 कामगारांचे बनावट लसीकरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे कामगार वर्गात प्रचंड घबराट पसरली आहे. या लसीकरणासाठी कंपनीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींनी 4 लाख 24 हजार रुपये उकळले आहेत. कामगार दुसरा डोस घेण्याकरिता गेल्यावर पहिल्या लसीच्या वेळी दिलेले सर्टिफिकेट फेक असल्याचे समजल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठी (35) व करीम व अन्य साथीदार यांच्या विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
23 एप्रिलला झाले होते बोगस लसीकरण:
नवी मुंबई परिसरातील अँटोबर्ग या शिरवणे एमआयडीसीमधील कंपनीतील 23 एप्रिलला 350 कामगारांचे लसीकरण करावे म्हणून 4 लाख रुपयांची रक्कम डॉ. मनीष त्रिपाठी यांच्या कांदिवली येथील केसीईपी हेल्थ केअर यांना दिली होती. मात्र या लसीकरण ठिकाणी डॉ. मनीष यांच्या माध्यमातून शिबिराच्या वेळी प्रशिक्षित नर्सेस व इतर स्टाफ नेमला नाही. तसेच लसींच्या ऐवजी वेगळाच द्रव पदार्थ लस म्हणून कामगारांना देण्यात आला.