ठाणे -आजपर्यंत आपण राष्ट्रीय पुरुष, नेते, अभिनेत्यांचे किंवा प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस अथवा जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे पाहिले आहेत. मात्र भिवंडी शहरात 'पोट्स' नावाच्या पाळीव श्वानाच्या वाढदिवसाला ( Blood donation camp for pet Dog birthday Bhiwandi ) एका मोठ्या हॉलमध्ये मोठ्या थाटात चाहत्याकडून रक्तदान करून साजरा करण्यात आला. शिवाय केक कापून व छत्रपती शिवरायांचा 'पोट्स' आशीर्वाद घेऊन वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्रात पहिल्यादांच श्वानाच्या वाढदिवसाला रक्तदान करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.
भिवंडी शहरातील ज्ञानराजा जनकल्याण संस्था आणि मी भिवंडीकर संकल्प रक्तदानाचा यांच्या संयुक्त संकल्पनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. भिवंडीतील मोहन पठाडे हे गेल्या तीन वर्षांपासून पाग जातीच्या श्वानाचे पालन-पोषण करतात. 'पोट्स'ला तीन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मैत्रणीने गिफ्ट स्वरूपात दिले होते. तेव्हापासून जीवापाड प्रेम करत घराच्या सदस्यासारखी त्या श्वानाची देखभाल करतात. 'पोट्स'च्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहन पठाडे यांनी भिवंडीतील पार्वती मंगल कार्यलयात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले होते. त्यात 'पोट्स'चे प्रेम करणाऱ्या बहुतांश तरुणांनी त्याला आशीर्वाद देऊन रक्तदान केले आहे.