ठाणे:भिवंडीतील काही 'शेवय्या'चा घाऊक विक्री करणाऱ्या माफियांनी अचानक गेल्या २० दिवसांपासून १०० ते १२५ रुपये किलो दराने मिळणारी शेवय्याचे दर दुप्पट करून त्याचा काळाबाजार सुरू केला आहे. याच काळाबाजाराची चर्चा भिवंडी शहरात होत असल्याचे पाहून शेवय्याच्या एका व्यापाऱ्याने उत्तरप्रदेशमधील बनारस शहरातून दोन ट्रक कच्च्या शेवय्या भिवंडी शहरात १०० रुपये किलो दराचे विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० एप्रिल रोजी दोन ट्रक भरून शेवय्याचे बॉक्स घेऊन निघाले.
माफियांची अशीही करामत: १३ एप्रिल रोजी दुपारी दोन्ही ट्रक मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येते आल्याची खबर काळाबाजार करणाऱ्या माफियांना लागली होती. त्यानंतर दोन कारमधून आलेल्या ४ अज्ञात आरोपींनी दुपारच्या सुमारास ट्रकचा पाठलाग करत दोन्ही ट्रक महामार्गावरील शिवसागर हॉटेलजवळ अडवले. ट्रक थांबताच अज्ञात आरोपीने ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय ट्रकच्या चाव्या आणि दोन्ही चालकांचे मोबाईल फोन हिसकावून घेत त्यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी दोन्ही ट्रक नजीकच्या सर्व्हिस सेंटरवर नेले आणि शेवय्यांच्या बॉक्सवर पाण्याचे फवारे मारून संपूर्ण शेवय्या भिजवल्या. त्यामुळे शेवय्या आणणाऱ्या व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.