ठाणे - घरांची साफसफाई करून किराणा माल भरून दिवाळी फराळ बनवण्यासाठी गृहिणींची लगबग घराघरांत सुरू झाली आहे. दिवावासीयांचे मात्र घरात अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाकडेच डोळे लागले आहेत. गेली १७-१८ वर्षे ज्या घरात काढली, संसारासाठी लागणाऱ्या छोट्यामोठ्या वस्तू पै पै जमा करून घेतल्या, तो संसार एका दिवसात रस्त्यावर आलाय. चार भिंतीचा आडोसा आणि डोक्यावर छप्पर मिळाले खरे; मात्र त्या भिंतीत तो आपलेपणा अजून आलेला नसल्याची खंत दिवावासीय व्यक्त करत आहेत.
ठाणे पालिकेने केली थेट कारवाई -
अनधिकृत बांधकामांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिवा शहरात ठाणे महानगर पालिकेच्यावतीने दिवा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेने उच्च न्यालालयाच्या आदेशाने रस्ता रुंदीकरणात अडथळे निर्माण करणाऱ्या दिवा रेल्वे स्थानक परिसरातील ६ इमारतींवर धडक कारवाई बुधवारी कारवाई केली आहे. या इमारतींमध्ये १२३ कुटुंब वास्तव्यास होते. कारवाई करण्याअगोदर प्रकल्पग्रस्त नागरिकांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या होत्या मात्र दिवाळीपर्यंत आम्हाला वेळ द्या अशी मागणी येथील नागरिक करत होते. नागरिकांच्या मागणीला ठाणे महापालिका प्रशासनाने विचारात न घेता बुधवारी थेट कारवाईचा बडगा उगारल्याने येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, आणि घरात असलेला संसार सुद्धा बाहेर काढण्याची वेळ न मिळाल्याने नागरिकांचा राग उफाळून आला होता.
डोळ्यासमोर घर झाले जमीनदोस्त -
गेली १५ ते १६ वर्षांपासून राहत असलेलं स्वप्नातलं घर आणि पै न पै जमा करुन संसारासाठी लागणाऱ्या छोट्यामोठ्या वस्तू डोळ्यासमोर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जमीन दोस्त झाल्या. यावेळी काहींनी कारवाईचा विरोध केला तर काहींना डोळ्यातील अश्रु वाहण्याशिवाय पर्याय मिळाला नाही. दिवा शहरात अशा अनेक अनधिकृत इमारती बांधण्यात येतात आणि कमी किंमतीत घरे मिळतात म्हणून नागरिक ती घेत असतात, ठाणे महापालिका प्रशासन नेहमीच याकडे दुर्लक्ष करत या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून पाणी बिल तसेच कर सुद्धा वसुल करते आणि अचानक काही वर्षांनी महापालिका प्रशासनाला जाग येते आणि अशा प्रकारे कारवाई केली जाते, त्यामुळे नक्की चूक कोणाची, स्थानिक लोकप्रतिनिधींच आपल्या भागात काय घडतंय याकडे लक्ष नसत का आणि याला जवाबदार नक्की कोण हा मोठा प्रश्न आहे.