ठाणे - भाजप बंडखोर आमदार निवडून येताच त्यांची घरवापसी झाली आहे. यामुळे निवडणुकीच्या काळात भाजप बंडखोरांवर सुरू केलेले भाजपचे डॅमेज कंट्रोल निकामी ठरले आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठीच भाजप बंडखोरांना पुन्हा पक्षात प्रवेश देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसह डझनभर केंद्रीय मंत्री प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते. त्यावेळी भाजपचे केंद्रीय अवजड उद्योग व संसदीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी भाजप बंडखोरांवर कारवाईसाठी डॅमेज कंट्रोलची स्थापना केल्याचे सांगितले होते.
निवडणुकीदरम्यान मीरा-भाईंदर मतदारसंघात बंडखोर गीता जैन यांची पक्षातून हकालपट्टीही केली होती. कल्याण पश्चिममधील बंडखोर भाजप उमेदवार नरेंद्र पवार यांच्यावर कधी कारवाई करणार? असा प्रश्न पत्रकारांनी मेघवाल यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी भाजपचे डॅमेज कंट्रोलचे काम सुरू असल्याचे सांगत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला होता.