ठाणे - 17 महिन्यात दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कल्याणनजिकच्या मांडा-टिटवाळा येथे शहराध्यक्ष असलेल्या भाजपच्या महिला अध्यक्षांनी तीन साथीदारांच्या मदतीने दहा ते बारा जणांना तब्बल 1 कोटी 72 लाख 83 हजार रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रेखा रामदास जाधव असे गंडा घालणाऱ्या भाजपच्या महिला शहराध्यक्षाचे नाव आहे.
भाजप महिला पदाधिकाऱ्यासह तीन साथीदारांवर कोटीच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल हेही वाचा -व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाच घेणारी 'ती' महिला पोलीस निलंबित
या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या भामट्या महिलेला ताब्यात घेतले आहे. श्रीकांत गंगाधर राव, सुनील गंगाधर आव्हाड आणि संदीप सानप अशी इतर आरोपींची नावे आहेत. हे फरार असल्याचे सांगण्यात आले.
सविस्तर वृत्त असे -
कल्याण शहर भाजप महिला आघाडीची अध्यक्ष असलेल्या महिलेसह तीन साथीदारांच्या संगनमताने कल्याण पश्चिम परिसरात झोजवाला कॉम्प्लेक्समध्ये एटीएम मल्टीट्रेड सर्व्हिसेस नावाचे कार्यालय थाटले होते. येथे ठेवीदारांना १८ महिन्यात दाम-दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून १ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दामदुप्पट करून देण्याच्या नावाने १० ते १२ ठेवीदारांना गंडा
आरोपी रेखा जाधव आणि तिच्या तीन साथीदारांनी कल्याणमध्ये एटीएम मल्टीट्रेड सर्व्हिस नावाने आलिशान कार्यालय झोझवाला कॉम्प्लेक्समध्ये 2014 मध्ये थाटले होते. ते मुख्य आरोपी श्रीकांत गंगाधर राव याच्या नावावर होते. तेव्हापासून आरोपी रेखा जाधव हि भाजपची पदाधिकारी असल्याने तिने शहरातील काही महिलांना दाम दुपट्ट करून देण्याचे आमिष दाखवले होते. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार चंद्रभागा ढेंगळे यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकूण ४५, लाख ९४, हजार रुपयांची गुंतवणूक ऑगस्ट २०१४ मध्ये केली होती. त्याचप्रमाणे मोतीबाई तयाराम बांबळे यांनीही १८ लाख ८७ हजार रुपये , संगीता उत्तम थोरात यांचे १९ लाख ३७ हजार रुपये, तर सायली संजय लवंदे यांनी २० लाख ७० हजार रुपये, जयश्री प्रकाश नाडर यांनी ३६ लाख २० हजार रुपये, मंगल संजय कोळी यांचे ९ लाख ५० हजार रुपये अशा रकमा १० ते १२ ठेवीदारांनी गुंतवल्या होत्या.
ठेवीदारांना मोबदला परत देण्याच्या नावाने बँक लोनची थाप
चार वर्षे होत आली तरीदेखील आरोपीने ठेवीदारांना मोबदला दिला नाही. त्यामुळे ठेवीदारांनी मोबदल्यासाठी तगादा लावला असता कंपनीचे नुकसान झाले आहे असे सांगून मुख्य आरोपी राव याने पैसे परत करणेसाठी बँक लोन करावे लागले, अशी थाप मारली. त्यानंतर गुन्ह्यातील दोन आरोपींनी तक्रादार महिलेच्या घराची कागदपत्रे खासगी सावकारी करणाऱ्या चंदा पाटील या महिलेकडे गहाण ठेवली आणि त्यावर २० लाख रुपये कर्ज उचलले. मात्र, ते पैसे ठेवीदारांना न देता आरोपींनी ठेवून घेतले. त्यानंतर पुन्हा काही ठेवीदारांना बँक लोन करून देतो, असे म्हणून इतरही ठेवीदारांकडून बँक लोनसाठी दागिने घेऊन अशी एकूण १ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भामट्या चौकडीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पत्रे करीत आहेत.
हेही वाचा -धक्कादायक! आर्थिक गुन्ह्यांच्या 63 टक्के प्रकरणात कुठलीच चौकशी नाही