ठाणे- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने २ जुलैपासून लॉकडाऊन सुरू केला. आता त्यात पुन्हा वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. मात्र, ठाण्यात व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये लॉकडाऊन बाबत रोष आहे, त्यामुळे लॉकडाऊनच्या मुदतवाढीला भाजपाने विरोध सुरू केला आहे. लॉकडाऊनबाबत जनतेत आक्रोश असून, यापुढे लॉकडाऊन वाढविल्यास भाजपकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा ठाणे भाजपने महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये वाढ न करण्याबाबत भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आयुक्तांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक भरत चव्हाण आदींचा समावेश होता.
कोव्हिड-१९ च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रात २ जुलैपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर त्याला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, लॉकडाऊनच्या काळातही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याच्या गोष्टीकडे भाजपच्या या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे लक्ष वेधले.
लॉकडाऊन वाढविण्यास ठाणे भाजपचा विरोध मुंबईमधील काही भागात सम-विषम नियमानुसार दुकाने व मर्यादित कर्मचाऱ्यांच्या साह्याने कार्यालये सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत ठाणेकरांची ये-जा सुरू आहे. मात्र, ठाणेकरांचे उपजिविकेसाठी आवश्यक व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे याबाबत जनतेत आक्रोश आहे. लॉकडाऊन हे एक माध्यम आहे. मात्र, त्यामुळे कोरोनाला आळा बसलेला नाही. यापुढे लॉकडाऊन वाढविण्या्ची भूमिका घेतल्यास भाजपकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी दिला. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भविष्यातील उपाययोजनांबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्याची विनंतीही भाजपने यावेळी केली.