ठाणे - राज्य सरकारने कोरोनाला पुढे करून विधिमंडळ अधिवेशनाचे सात दिवस कमी केल्याची टीका भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर करत आहेत. या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा नागरिकांच्या आरोग्याचा विषय आहे, त्यामुळे भाजपने यामध्ये राजकारण करू नये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी अंबरनाथमध्ये आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे यांची कार्यकर्ता आढावा बैठकीला उपस्थिती कोरोनाच्या नियमांचे पालन करून मेळाव्याचे आयोजन
सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोना वाढत आहे. दरम्यान कोरोना वाढत असल्याने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच आम्ही मेळावे घेत आहोत. मेळाव्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी देखील परवानगी दिली आहे, जर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली असती तर मेळावे घेतले नसते. कोरोनामुळे आम्ही जनता दरबार देखील रद्द केला अशी माहिती देखील यावेळी सुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील
वनमंत्री संजय राठोड यांना कोण वाचवत आहे ते माहीत नाही, मात्र मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासन जे खर असेल त्याला न्याय देण्याचे काम करतील असेही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.