ठाणे - भाजपच्या बलात्कारी पदाधिकारी गुंडाची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. कल्याण जिल्हा भाजपचा उपाध्यक्ष आणि एकेकाळी गवळी गॅंगचा नामचीन गुंड संदीप गोपीनाथ माळी (वय 41) याला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. आरोपी संदीप माळी याला पाच दिवस पोलीस कोठडीतील चौकशीनंतर शुक्रवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मानपाडा पोलिसांनी अधिक कोठडीची मागणी कोर्टाकडे केली. मात्र, कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी आधरवाडी तुरुंगात करण्यात आली आहे.
आरोपी संदीप माळी हा भाजपचा कल्याण शहर जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. संदीप रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन तरुणीवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार करीत होता. यासंदर्भात पीडित तरुणीने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली होती. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कल्याण क्राईम ब्रांचने बलात्काराच्या प्रकरणात संदीपला शनिवारी (17 ऑगस्ट) पहाटे महाबळेश्वर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पीडित तरुणीच्या जबानी वरून मानपाडा पोलीस ठाण्यात भादवि कलम 376, 354, 323, 506, 502 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 या पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.