ठाणे- भिवंडी महापालिकेत महापौर पदावर कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील आणि काँग्रेसच्या फुटीर गटाचे नगरसेवक इम्रान वली खान यांना भाजपच्या २० नगरसेवकांनी मतदान केले आहे. यावर भाजपचे भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. राज्यात शिवसेनेने जे केले, ते भिवंडीत होऊ देणार नाही. ही भिवंडी आहे, येथे कोणाचे चालणार हे भाजपच ठरवेल, त्यामुळे शिवसेनेने समजून घ्यावे, असा इशारा चौघुले यांनी दिला. काँग्रेसच्या फुटीर उपमहापौराला केलेल्या मतदानाचे त्यांनी समर्थन केले.
हेही वाचा -ठाण्यात धुळखात पडलेल्या गाड्यांवर विनोद रेखाटले, गाड्या हटवण्याची मागणी
तत्कालीन महापौर जावेद दळवी यांच्यामुळे शहराची वाताहत झाली असून, त्यांनी विकासाचे कुठलेही कामे केले नाही. त्यामुळे माझ्यासह १८ नगरसेवकांनी हा निर्यण घेतला. तसेच कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करण्याचा व्हिप आम्हाला असल्याचे काँग्रेसचे फुटीर गटाचे नगरसेवक इम्रान वली खान यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हाच सत्तेचा पॅटर्न समोर येणार असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले. मात्र, भिवंडी महापालिकेत केवळ चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीने भाजप, समाजवादी, रिपाई ऐक्य, अपक्ष आणि १८ फुटीर काँग्रेसच्या नगरसेवकांशी केलेल्या सौदीबाजीमुळे आज कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील महापौर तर उपमहापौर पदी इम्रान वली खान विजराजमान झाले. मात्र, पालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतील राजकीय उलथापालथीमुळे काँग्रेसचे स्थानिक पातळीवर मोठे नुकसान झाले आहे.