महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेश नाईक त्यांच्या मतदारसंघात काम करत नाहीत; मला लक्ष घालावे लागेल- आमदार मंदा म्हात्रे - मंदा म्हात्रेची गणेश नाईकांवर टीका

मंदा म्हात्रे यांनी आता गणेश नाईक यांच्यावर थेट आरोप केला आहे. गणेश नाईक हे त्यांच्या मतदारसंघात काम करत नसल्याने मला आता स्वतःहून सुरुवात करावी लागेल. तसेच प्रसंगी मला नाईक यांच्या ऐरोली मतदारसंघात जावे लागणार आहे. तेथील सर्वसामान्य लोकांची कामे करावी लागणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी म्हंटले आहे.

-आमदार मंदा म्हात्रे
-आमदार मंदा म्हात्रे

By

Published : Sep 23, 2021, 9:27 AM IST


नवी मुंबई - आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आता थेट गणेश नाईक यांच्या मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. गणेश नाईक त्यांच्या मतदारसंघात काम करत नाहीत, अशी खोचक टीका मंदा म्हात्रे यांनी केली आहे. तसेच यापुढे मला त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालून जनतेच्या समस्या सोडवाव्या लागतील असेही म्हात्रे यांनी म्हणाल्या आहेत.

गणेश नाईक त्यांच्या मतदारसंघात काम करत नाहीत-

गणेश नाईकांचे नवी मुंबई शहरात राजकीय वर्चस्व आहे. याच कारणावरून मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात नेहमीच वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मंदा म्हात्रे यांनी आता गणेश नाईक यांच्यावर थेट आरोप केला आहे. गणेश नाईक हे त्यांच्या मतदारसंघात काम करत नसल्याने मला आता स्वतःहून सुरुवात करावी लागेल. तसेच प्रसंगी मला नाईक यांच्या ऐरोली मतदारसंघात जावे लागणार आहे. तेथील सर्वसामान्य लोकांची कामे करावी लागणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी म्हंटले आहे. एवढेच नाही तर खाडीकिनारी जेट्टी उभारून इतर कामे ही करणार असल्याचे आश्वासन मंदा म्हात्रे यांनी दिले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यापासून वाद-

आमदार मंदा म्हात्रे व गणेश नाईक हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हापासून या दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई आहे. 2014 ला मंदा म्हात्रे या भाजप मध्ये गेल्या त्यानंतर हा वाद आणखी वाढला. मात्र पुढे गणेश नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 ला नाईक हे भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद अजूनही तसाच आहे.

भाजपमध्ये महिलांना सन्मान मिळतं नसल्याची खंत-

आमदार मंदा म्हात्रे यांनी यापूर्वी देखील स्वत:च्या पक्षावरच टीका केली होती. भाजपामध्ये महिलांना भाजपमध्ये सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती, तसेच भाजपातील नेते महिलांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप देखील म्हात्रे यांनी केला होता.


मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या मतदारसंघातील कामावरून आता नाईक यांच्यावर निशाणा साधला असताना आता नाईक म्हात्रे यांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच भाजपाच्याच दोन आमदारांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आता भाजपाचे पक्ष श्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात याबाबतही बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघातील मतदारांना उत्सुकता असणार आहे.

हेही वाचा - स्वपक्षातील नेत्यांकडून महिला नेत्यांचे पंख छाटले जातात; मंदा म्हात्रेंचा रोखठोक विधान

हेही वाचा - भाजपला शिवसेनेने जगवले -यशवंत जाधव

ABOUT THE AUTHOR

...view details