ठाणे -दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बाजारपेठेतील गर्दी वाढणार असून, त्यामुळे बाजार पेठेच्या ठिकाणी मास्क, स्क्रिनिंग तसेच योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत भाजपा आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी महापालिका रुग्णालयात रूग्ण मृत पावला म्हणून त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची केलेली तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना केलेली मारहाणीचा निषेध व्यक्त केला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मॉल, बाजारपेठा, एपीएमसी मार्केट येथील होणारी गर्दी पाहता नवी मुंबई शहरात कोरोना आणखी पसरण्याची भीती भाजपा आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली. गणपतीनंतर शहरात अचानकपणे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली होती, त्यामुळे सद्यस्थितीत प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे, असे नाईक यांनी सांगितलं.
त्या मारहाणीचा केला निषेध -
नवी मुंबईच्या वाशीमधील महापालिका रुग्णालयात रुग्ण मृत पावला म्हणून त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या घटनेचा निषेध नाईक यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी महापालिकेचे स्वतःचे पोलीस ठाणे असावे, त्या ठिकाणी एसीपी हुद्द्याचा अधिकारी, 2 ते 3 पोलीस निरीक्षक, 7 ते 8 पोलीस उपनिरीक्षक हुद्द्याचे व 100 पोलीस कर्मचारी असावेत व त्यांचे वेतन महापालिकेने गृहमंत्रालयाला अदा करावे, अशी मागणी गणेश नाईक यांनी केली.
हेही वाचा -कल्याण-शिळ मार्गावर पुन्हा मोठी जलवाहिनी फुटली; रस्त्याला नदीचे स्वरूप
हेही वाचा -उल्हासनगरात हनुमान मंदिर तोडून विकासकाकडून बांधकाम, स्थानिकांसह बजरंग दलाचा विरोध