महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीवर डोळा ठेवून स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामावरून भाजप आमदार-खासदारांची नाराजी

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर डोळा ठेवून येत्या काळात स्मार्ट सिटीवरून भाजप-शिवसेनेमध्ये राजकीय कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसून आले आहे.

निवडणुकीवर डोळा ठेवून स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामावरून भाजप आमदार-खासदारांची नाराजी
निवडणुकीवर डोळा ठेवून स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामावरून भाजप आमदार-खासदारांची नाराजी

By

Published : Oct 25, 2020, 3:41 PM IST

Updated : Oct 25, 2020, 5:17 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची सर्वपक्षीय खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे संथगतीने सुरू असल्याने भाजप खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत असमाधानी असल्याचे सांगितले. मात्र, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर डोळा ठेवून येत्या काळात स्मार्ट सिटीवरून भाजप-शिवसेनेमध्ये राजकीय कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसून आले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या ११ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता पाहून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. विशेषतः यंदाची निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. गेल्या ८ महिन्यांपूर्वीच युतीत फाटाफूट झाल्याने तेव्हापासूनच दोन्ही पक्ष महापालिकेची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. मात्र, मनसेचा विस्तार कल्याण डोंबिवलीत बऱ्यापैकी असल्याने भाजप व शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत फटका बसल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गेल्या महापालिका निवडणुकीत काही जागेवरून युती फिसकटल्याने दोन्ही पक्षांनी सर्वच जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या विकासकामांना ६ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, निवडणुकीनंतर सेना-भाजप शहराच्या विकासकामांवरून पुन्हा युती झाली. यामध्ये सेनेचा महापौर तर भाजपला उपमहापौर मिळाले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ६ कोटींच्या पॅकेजबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेकडे ६ हजार कोटींपैकी किती निधी केंद्र व राज्य सरकारने दिला. याबाबत माहिती मागवली असता त्यावेळी एक रुपयाही जाहीर केलेल्या पॅकेजमधून आला नसल्याचे उघड केले होते.

आता पुन्हा महापालिकेची निवडणूक पाहता महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांबाबत शनिवारी सायंकाळी पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भाजप खासदार कपिल पाटील, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनिता राणे, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. लोकप्रतिनिधीनी स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी काही वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपहरण व हत्या अशा सहा घटना घडल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र कनेक्ट करा अशी मागणी याआधी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ही मागणी पूर्ण करण्याची मागणी केली. तर खासदार कपिल पाटलांनी स्मार्टसिटीचे काम संथगतीने सुरू असल्याचे प्रशासनाला सुनावले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारली आहे. त्याचे कंट्रोल कमांड रुममध्ये काय व कसे स्वरुप दिसेल याचे सादरीकरण या बैठकीत केले असता केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निधी दिला आहे. त्याचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही यासाठी संताप व्यक्त केला, तर मनसे आमदार राजू पाटील व आमदार गणपत गायकवाड यांनीदेखील प्रशासनाला सूचना केल्या.

कल्याणचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी फेब्रुवारीपासून आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या कामांना गती दिलेली आहे. जी जी कामे प्रस्तावित केली होती ती कामे पूर्ण गतीने करत आहोत. कोरोना काळात सर्व यंत्रणा व्यस्त होती. पावसामुळे कामाचा वेग मंदावला होता. मात्र, आता ही कामे पुन्हा वेगाने सुरू करण्यात आली असून येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवली स्मार्ट शहरे होतील, असा विश्वास व्यक्त केला. एकंदरीतच आगामी पालिकेच्या निवडणुकीत स्मार्ट सिटीच्या नावाने भाजप-शिवसेना मतदारांना आकर्षित करून प्रचाराचा मुद्दा करणार असल्याचे दिसून आले आहे.

Last Updated : Oct 25, 2020, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details