ठाणे -अनंत करमुसे मारहाण प्रकरणात काल (गुरुवारी) मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक करून जामीन देखील मंजूर झाला. त्यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी अनंत करमुसे यांना घेऊन भाजपा नेते किरीट सोमैया हे वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे पोलिसांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी आरोप असलेल्या पोलिसांवर आणि अन्य गुन्हेगारांवर ज्याप्रमाणे कलम लावलेत, त्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड देखील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर देखील तीच कलमे लावावीत, अशी मागणी सोमैयांनी केली आहे. असा गुन्हेगार महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये बसणे योग्य नाही, असेही सोमैया म्हणाले. मनसुख हिरेन प्रकरणात अनिल देशमुख यांना घरी जावे लागले. अनंत करमुसे यांची ठाकरे पवार सरकारला हत्या करून दहशत माजवायची होती आणि त्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावर होती, म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली.
करमुसे मारहाण प्रकरणात मंत्री आव्हाड यांच्यावर कलम लावण्यात आली आहेत, ती कमी आहेत. ते देखील मुख्य गुन्हेगार असल्याचे सांगत किरीट सोमैयांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनंत करमुसे यांच्यासोबत जाऊन जाब विचारला आणि वाढीव कलमांची मागणी केली.
'माझा मनसुख हिरेनप्रमाणे हत्येचा कट होता'
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मला वसई खाडीत फेकण्याची धमकी दिली होती. पोलीस दबावाखाली काम करत आहेत. हा तपास केंद्रीय संस्थेने करावा, अशी मागणी करमुसे यांनी पोलिसांना भेटून झाल्यावर केली आहे.