ठाणे - महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र, कोरोनाच्या काळात राज्यातील राजकारण जोरात सुरु आहे. ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक 15 जुलैला तर पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी 5 जुलैला निवडणुका घेण्यात येणार आहेत. भिवंडी पंचायत समितीच्या निवडणुकीत सेना - भाजपमध्ये छुपी युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निष्ठावंत सेना सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
कोरोनाचा फैलाव वाढला असला तरी भिवंडीतील ग्रामीण राजकारणाचा पारा देखील चढलेला दिसत आहे. विशेष म्हणजे, राज्यात सेना भाजपने एकमेकांपासून फारकत घेतली असल्याने स्थानिक नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र, भाजपला एकहाती मात देण्यासाठी भिवंडीत महायुतीचा फॉर्म्युला अडीच वर्षांपूर्वीच अस्तित्वात आला होता. भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकत्र येत भिवंडी पंचायत समिती निवडणूक लढवली गेली होती. महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे पंचायत समितीवर एकहाती दावा करणाऱ्या भाजपला 19 जागांवर समाधान मानावे लागले होते.
एकूण 42 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी पंचायत समितीत भाजप 19, शिवसेना 19, काँग्रेस 2, मनसे 1 राष्ट्रवादी 1 असे पक्षीय बलाबल निर्माण झाले. अडीच वर्षांपूर्वी सभापती निवडणुकीत काँग्रेसचे दोन सदस्य भाजप गोटात गेले असल्याने भाजप व महायुतीकडे 21-21 अशी सम-समान सदस्य संख्या असल्याने या निवडणुकीत चिठ्या उडवून सभापती पद घोषित करण्यात आले होते. ही नशिबाची चिठ्ठी भाजप उमेदवाराच्या नावाने निघाल्याने भाजपच्या रवीना रवींद्र जाधव या सभापती झाल्या होत्या.