मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या झेंड्यासह विचारधाराही बदलली. थेट हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने मनसे भाजप सोबत जाईल, अशी चर्चा जोर धरत आहे. मात्र, आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप मनसे सोबत युती करणार नसल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या दोन दिवसीय राज्य अधिवेशनाची माहिती देताना त्यांनी युतीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा-नाणार रिफायनरीची जाहिरात चक्क 'सामना'त; शिवसेनेची भूमिका बदलली?
नवी मुंबई महापालिकेसाठी महाविकासआघाडी एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार गणेश नाईक यांची महापालिकेत सत्ता आहे. महाविकासआघाडी एकत्रितपणे निवडणूक लढल्यास भाजपच्या गणेश नाईक यांना मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सध्या हिंदुत्वाची भूमिका घेतलेला मनसे भाजपसोबत जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, तावडे यांनी याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली.
गणेक नाईक यांच्यासोबत असलेल्या काही नगरसेवकांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पक्षात काही जणांना तिकीट मिळणार नसल्याची चर्चा असल्यानेच काही नगरसेवक वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे तावडे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईत आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाणार असून अन्य कोणत्याही पक्षासोबत युती होणार नसल्याचे तावडे म्हणाले.
पुढील काळात प्रखर विरोधी पक्ष म्हणून कसे काम करता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. 80 दिवसाच्या कालावधीत महाविकासआघाडीने जनतेची फसवणूक केली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यात सीएए, राममंदिर, 370 चा मुद्दा मांडला जाणार आहे. तसेच शेतकरी व महिला या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहेत.
जनतेच्या मताचे नाही तर खुर्चीच्या हिताचे सरकार-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या संदर्भात मोर्चेबांधणी केली जाणार असून, एक नवीन विकासाचे पर्व पाहायला मिळणार आहे. थेट सरपंच निवडणूक रद्द करण्याच्या वादावर बाळासाहेब थोरात यांना घरचा आहेर मिळाला आहे. अनेक चांगल्या गोष्टींना सध्याचे सरकार स्थगिती देत आहे. त्यांचा हा स्थगिती देण्याचा कल राजकीय आसुडापोटी होत आहे. हे जनतेच्या मताचे सरकार नाही, खुर्चीच्या हिताचे सरकार आहे, अशी टिकाही त्यांनी केली.