ठाणे: उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०२३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला ५ जागा देऊ केल्या होत्या; मात्र युतीची बोलणी फिस्कटल्याने युती तुटली होती. मुरबाड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकार पॅनेलने १७ पैकी १५ जागांवर निवडणूक जिंकत भाजपचे वर्चस्व राखले.
आमदार कथोरे यांची एकहाती सत्ता:कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरच्या एकूण १८ जागांपैकी शिवसेनेची १ जागा ग्रामपंचायत मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेली होती. त्यानंतर प्रत्यक्ष १७ जागांसाठी निवडणूक लागली होती. सेवा सहकारी सोसायटीमधून ११ पैकी ११ जागा भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकारी पॅनेलने जिंकल्या. २ पैकी २ जागा व्यापारी मतदारसंघातून तर १ पैकी १ जागा हमाल व तोलाई-माथाडी मतदार संघातून सहकार पॅनेलने जिंकल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून ३ पैकी १ अशा एकूण १५ जागा या आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने जिंकल्या. फक्त 3 जागा या शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यामुळे उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आमदार किसन कथोरे यांची एकहाती सत्ता आली आहे.
युती-आघाडीची बरोबरी:शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्या पैकी 1 जागा ही ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असल्याने ती भाजप पुरस्कृत बिनविरोध करण्यात आली होती. त्यामुळे एकूण 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती विरोधी महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर पहावयास मिळाली. युती व आघाडीला समसमान आठ-आठ जागा मिळाल्याने बाजार समितीवर कुणाचा अध्यक्ष बसणार? हे आता निवडून आलेल्या 2 अपक्ष उमेदवारांच्या हातात आहे. निवडून आलेल्या उमेदवारांपैकी महाविकास आघाडीचे ८, शिवसेना-भाजप युती ८, महाविकास आघाडी एकूण निवडून आलेल्या जागांपैकी शिवसेना (ठाकरे गट) ५, राष्ट्रवादी २, काँग्रेस २, तर भाजप-शिवसेना युती विजय उमेदवारांमध्ये शिवसेना (शिंदे गट) ४, भाजप ४ असे एकूण ८ तर दोन ठिकाणी अपक्ष असे १८ जागेचे निकाल समोर आले.
मुरबाड 'कृउबा' समितीत शिंदे गटाची बाजी:मुरबाड कृषी बाजार समितीत १८ जागांसाठी प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत सेवा संस्थांच्या ११ जागांसह सर्वच म्हणजे १५ मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले. तर ग्रामपंचायत मतदार संघामधील सुरेश बांगर, रमेश उघडा आणि अशोक मोरे हे फक्त ३ भाजपचे उमेदवार निवडून आल्याने शिंदे गटाने पुन्हा एकदा आपली सहकार क्षेत्रातील पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरीकडे भाजपच भाजपच्या पराभवाचे कारण असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरु झाली आहे.
भिवंडीत महायुतीला १० जागा:भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीची महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व भाजप युतीची परिवर्तन पॅनल अशी थेट टक्कर झाल्याचे पाहवयास मिळाले आहे. एकूण १८ जागांपैकी १० जागा भाजप-शिंदे गटाला मिळाल्या आहे. तर ८ जागा महाविकास आघाडीचे पटकावल्या आहेत. आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे १० पैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघात महायुतीचे ३ उमेदवार विजयी झाले. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एका ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेचा निकाल मविआच्या दिशेने लागला. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीची सत्ता स्थापन होऊनही 'गड आला,पण सिंह गेला' अशा प्रतिक्रिया महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून उमटत होत्या.
हेही वाचा:Maharashtra New 22 Districts : राज्यात 22 नवे जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांचे होऊ शकते विभाजन