ठाणे - ठाणे महापालिकेत अनेक कामात भ्रष्टाचार होत असून, घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे. एकीकडे महापालिकेवर कर्ज घेण्याची वेळ आली असताना, बिल्डरांना शुल्कमाफी दिली गेली. तर ताब्यात नसलेल्या गायमुखच्या चौपाटीच्या विकासासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या बेजाबदार कारभारामुळेच एकेकाळी श्रीमंत महापालिकेवर कर्जासाठी हात पसरण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे व संजय केळकर यांनी केली आहे.
भ्रष्टाचार उघडकीस, कारवाई मात्र नाही - भाजप
कोविडच्या काळामध्ये अनेक घोटाळ्यांची मालिका सुरूच होती. ग्लोबल कोविड व पार्किंग प्लाझा येथील रुग्णालयातील गैरप्रकारांना जबाबदार कंत्राटदार मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कंपनीला पाठिशी घातले जात आहे. तब्बल २१ जणांना बेकायदेशीररित्या लस दिल्याचे उघडकीस आल्यानंतर चौकशी अहवाल दडपून कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. इतकेच नव्हे तर प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी नवा चौकशी आयोग स्थापन झाला, याकडे भाजपाच्या वतीने लक्ष वेधण्यात आले. कोविड प्रतिबंधात्मक साहित्यातील खरेदी व कंत्राटातील भ्रष्टाचारापाठोपाठ नालेसफाईमध्ये`हातसफाई' झाल्याचे उघडकीस आले. पहिल्याच पावसात हजारो नागरीकांच्या घरात पाणी घुसले. नालेसफाई न झाल्याच्या तक्रारी झाल्या. मात्र, कारवाई काहीच झाली नाही. अशा पद्धतीने महापालिकेच्या तिजोरीची लूट सुरू आहे, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला.
शिवसेनेमुळेच महापालिकेवर हात पसरण्याची वेळ - भाजप
ठाणेकरांवर अनावश्यक प्रकल्प व योजना लादून सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासन लूट करीत आहे. कोविड रुग्ण किंवा लस घेतलेल्या एका व्यक्तीची फोनवरून विचारपूस करण्यासाठी तब्बल १५ रुपये खर्च हे उधळपट्टीचे अनोखे उदाहरण आहे. महापालिकेच्या ताब्यात नसलेल्या गायमुख चौपाटीच्या विकासासाठी २२ कोटींचा खर्च करण्यात आला. बिल्डरांना ५० टक्के प्रिमियम माफी देऊन महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून घेण्यात आले. तिजोरी रिकामी असताना बिल्डरांना शूल्कमाफीचा निर्णय कसा घेतला, हे आकलनापलीकडे आहे. ३०८ कोटींचा मेट्रो सेस बिल्डरांकडून वसूल केला गेला नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या व बेजाबदारपणे घेतलेल्या निर्णयांमुळे महापालिकेचे नुकसान झाले आहे. महापालिका आता एक हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. एकेकाळी श्रीमंत महापालिकेवर सत्ताधारी शिवसेनेमुळेच हात पसरण्याची वेळ आली. तर, कर्जफेड करण्यासाठी ठाणेकरांवर छुपे कर लादले जातील, अशी भीती आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. ठाणेकरांच्या ५०० चौरस फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आता त्या आश्वासनाचा सोयिस्कर विसर पडला असून त्यावर कोणी अवाक्षरही काढत नाही. अशा पद्धतीने ठाणेकरांची फसवणूक करण्यात शिवसेना आघाडीवर आहे, असा आरोप केळकर यांनी केला.