ठाणे - खंडणी मागीतल्याच्या गुन्ह्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण पवार हे फरार होते. विकासकाकडून ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नारायण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अटकपूर्व जामिनाच्या जोरावर नारायण पवार यांना अटक होत नव्हती.
गेल्या आठवड्यात नारायण पवार यांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुवावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ठाणे नगरपालिका भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून नारायण पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शेवटी आज ठाणे पोलिसांच्या कासारवडवली पोलिसांनी नारायण पवार यांना अटक करुन ठाणे न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना ठाणे न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.