महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : कोयत्याने केक कापून दहशत माजवणाऱ्या बर्थडे बॉयला अटक; धारदार कोयताही जप्त - धारदार कोयत्याने केक कापला

ठाणे जिल्ह्यात सार्वजिनिक ठिकाणी वाढदिवसाचा केक धारदार कोयत्याने कापून गावात दहशत निर्माण करणाऱ्या एका बर्थडे बॉयला कोनगाव पोलीस पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. नवेश सुदाम पाटील उर्फ नवा भाई (वय ३१ वर्षे, रा. पिंपळघर, ता. भिवंडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने स्वत:ला भाई असल्याचे भासवत हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे.

Thane Crime
कोयत्याने कापला केक

By

Published : Jan 16, 2023, 6:25 PM IST

कोयत्याने कापला केक

ठाणे : नवा भाईचा ११ जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने त्याने मित्रांसह पिपंळघर गावातील सार्वजनिक ठिकाणी एक दोन फूट लांबीच्या धारदार कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान १५ जानेवारी रोजी हा व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या निर्दशनास आला.

पोलीस विभाग सतर्क :कोयत्याने केक कापण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्याचे पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्य्क पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि अभिजीत पाटील, पोहवा मधुकर घोडसरे, अमोल गोरे, श्याम कोळी, पो.शि. हेमंत खडसरे यांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

कोयता जप्त :पोलिसांनी आरोपीकडून एक दोन फूट लांबीचा धारदार कोयताही जप्त केला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५, सह शस्त्र अधीनियम कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी आरोपी नवा भाईला भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोहवा अमोल गोरे हे करीत आहे.

यापूर्वीही घडल्या घटना :मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून शहरात शस्त्र बंदीचा आदेश लागू आहे. असे असतानाही 25 नोव्हेंबर रोजी एनएसयुआय मुंबई अध्यक्ष प्रद्युम यादव यांनी आपल्या समर्थकांसह धारदार शस्त्राने केक कापला आणि शस्त्रही नाचवले. एवढेच नाही तर प्रद्युम यादवने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही टाकला होता. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ माजली होती.

पोलिसांची कारवाई : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विक्रोळी पोलिसांनी आरोपीला 27 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अटक करून शस्त्रही जप्त केले होते. आरोपीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) सह 135 सह कलम 4, 5 अन्वये अटक करण्यात आली होती. विक्रोळी पोलीसांनी ही कारवाई केली. प्रद्युम यादवने भारत जोडो यात्रेत भाग घेतला होता. त्याच्या फेसबुक पेजवर त्याने राहुल गांधींसोबतचे फोटोही अपडेट केले होते.

पोलिसांसाठी डोकेदुखीच : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव यांनी शुक्रवारी विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ त्यांच्या समर्थकांसोबत वाढदिवस साजरा केला होता. या दरम्यान शस्त्राने केक कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. यादववर आर्म्स अॅक्ट तसेच मुंबई पोलिस अॅक्टच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र, शस्त्राने भर चौकात किंवा रस्त्यावर केक कापून स्वत:ला भाई भासविण्याचे कुचलन पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

हेही वाचा :Shirdi Crime News : शिर्डीतील मेडीकल चालक महिलेचा दोन लहान मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न; मोबाईलवर ठेवले स्टेटस

ABOUT THE AUTHOR

...view details