ठाणे - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर केलेल्या उपचारांचा उर्वरित कचरा रूग्णालयांतून थेट रस्त्यावर आणून टाकला जात असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. डोंबिवलीमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी वापरलेल्या वस्तू आणि कचरा आणून टाकण्याच्या या प्रकारामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या निवासी भागातील मिलापनगर तलावासमोर कुणीतरी बायोमेडिकल वेस्टच्या प्लास्टिक पिशव्या आणून टाकल्या होत्या. त्या पिशव्यांमध्ये हातमोजे, मास्क, प्लास्टिक, रबर सदृश्य वस्तू दिसून आल्याने जवळपास राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर डोंबिवली एमआयडीसीच्या फेज-2 मध्ये डोंबिवली नागरी सहकारी बँक ते दुर्वांकुर हॉल दरम्यान सर्व्हिस रोडच्याकडेला कोविड-19 च्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये वापरले जाणारे पीपीई किट आणि इतर वापरलेले साहित्य (मेडिकल वेस्टेज) मोठ्या प्रमाणात गोण्यांमध्ये भरून आणून टाकण्यात आले आहे. हा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संतप्त स्थानिकांनी केली आहे.