ठाणे - रस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला करायला सांगितल्याने वाद होऊन दुचाकी चालकाने पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ( bike riders beat to psi in ambernath thane ) हि घटना अंबरनाथमधील वांद्रापाडा परिसरातील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दुचाकी चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुरेश उर्फ नटवर जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस पथक धावून येताच आरोपींनी काढला पळ -अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात जगदीश गीते हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंबरनाथच्या कोहोजगाव दर्गा परिसरात त्यांची बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती. तिथला बंदोबस्त संपवून ते पुन्हा पोलीस ठाण्याकडे परतत असताना वांद्रापाडा परिसरात आरोपी सुरेश उर्फ नटवर जाधव याने भररस्त्यात दुचाकी आडवी लावल्याचं गीते यांना दिसले. त्यामुळे गीते यांनी आरोपी जाधव याला दुचाकी बाजूला करण्यास सांगितले असता, नटवर जाधव याने गीते यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी श्रीकांत जाधव नावाचा नटवर याचा आणखी एक साथीदार सुद्धा पोलीस उपनिरीक्षक गीते यांच्या अंगावर धावून गेला. याचवेळी बंदोबस्त संपवून मागून आणखी काही पोलीस कर्मचारी येत होते. त्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी तिथे धाव घेतली. यावेळी नटवर आणि श्रीकांत जाधव हे दोघेही पळून गेले.