महाराष्ट्र

maharashtra

Bike Driver Accident: रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकी चालकाचा डंपरखाली चिरडून मृत्यू

रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकी चालकाचा तोल जाऊन तो डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील व्दारली गावातील कल्याण मलंगगड रस्त्यावर हा अपघात झाला.

By

Published : Jul 21, 2023, 4:37 PM IST

Published : Jul 21, 2023, 4:37 PM IST

Bike Driver Accident
अपघात

युवकाच्या अपघात प्रकरणी माहिती देताना शहर अभियंता

ठाणे :या अपघात प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून डंपर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूरज गवारी असे डंपरखाली चिरडलेल्या तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा भागातील रहिवासी होता.


खड्डे चुकवत असताना गेला तोल :मृतक सूरज गवारी हा कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा परिसरात कुटुंबासह राहत होता. तो गुरुवारी रात्री दुचाकीवरुन कल्याण-मलंगगड रस्त्याने जात होता. या रस्त्यावर खड्डे असल्याने खड्डे चुकवण्याची कसरत सूरजला करावी लागत होती. व्दारली गावाजवळ पोहचल्यावर खड्डे चुकवत असताना सूरजचा दुचाकीसह तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी तो भरधाव वेगात असलेल्या डंपरखाली आला. डंपरचे चाक सूरजच्या अंगावरून गेल्याने सूरजचा जागीच मृत्यू झाला. या परिसरातील पोलीस पाटील चेतन पाटील यांनीही खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असल्याची माहिती दिली. याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकांऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. उल्हासनगर हद्दीतील हिललाईन पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


खड्डे अपघाताची ही पहिली घटना :अपघातानंतर व्दारली गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या खड्ड्यांना जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मलंगगड, नेवाळी परिसरातील गावांमधील नोकरदार, दूध, भाजीपाला विक्रेते दररोज कल्याण रेल्वे स्थानकात येण्यासाठी मलंगगड रस्त्याचा वापर करतात. नांदिवली तर्फ ते नेवाळी नाकापर्यंतच्या मलंगगड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पर्यायी रस्ता नसल्याने प्रवाशांना चाळण झालेल्या मलंगगड रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. पाऊस सुरू झाल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दरवर्षी खड्ड्यांमुळे तीन ते चार अपघात होतात. यावेळी पाऊस सुरू झाल्यानंतर खड्डे अपघाताची ही पहिली घटना आहे.


ठेकेदार, अभियंत्यावर कारवाईचा इशारा :विशेष म्हणजे गुरुवारी दुपारी कल्याण डोंबिवली पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी शहर हद्दीतील खड्डे विनाविलंब बुजविण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार, अभियंत्यावर कारवाईचा इशाराही दिला आहे. या आदेशानंतर काही तासात खड्डे अपघाताची घटना घडल्याने पालिका प्रशासन मलंगगड रस्त्याचा ठेकेदार, या रस्त्याचा नियंत्रक अभियंता यांच्यावर कारवाई करते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


कल्याण पूर्वेतील यापूर्वीचे अपघात:
- २६ जुलै २०१६: रोजी मलंगगड रस्त्यावर प्राजक्ता फुलोरे दुचाकीवरून जात असताना दुचाकी खडड्यात आपटली. बाजुने जात असलेला डम्पर अंगावरुन गेल्याने तिचा मृत्यू झाला.
- ११ जुलै २०१८: व्दारली येथे तबेला कर्मचारी अण्णा खड्डयात पाय मुरगळून रस्त्यावर पडला. बाजुचे वाहन अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
- १४ जुलै २०१८: चिंचपाडा रस्त्यावर विलास दलाल दुचाकीसह खड्ड्यात आपटून गंभीर जखमी झाले.
- १६ जुलै २०१८: डोंबिवली निवासी सुरेश साने सूचक नाका येथे दुचाकी खड्ड्यात पडल्याने जखमी झाले.
-१८ जुलै २०१८: भारती नरे व मुलगी हे दोघेही नेतिवली चौक येथे दुचाकी खड्ड्यात आपटून गंभीर जखमी झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details