ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना डॉ. मोहन भागवत ठाणे:मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या धर्तीवर ठाणे पालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील बाळकुम येथील ग्लोबल रुग्णालयाच्या आवारात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय तसेच या परिसरात त्रिमंदिर संकुल उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजन प्रसंगी मोहन भागवत ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. तसेच दादा भगवान फाउंडेशनचे संस्थापक दीपक भाई देसाई, पालकमंत्री शंभूराज देसाई, केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील, जितो एज्युकेशन अँड मेडिकल ट्रस्टचे चेअरमन अजय अशर, दीपक बेडा, चंद्रकांत गंगागिरी, महेंद्र जैन, भरत मेहता, प्रवीण छेडा यांच्यासह टाटा कॅन्सरचे डॉ. शैलेश श्रीखंडे उपस्थित होते.
जन्म आणि कर्माचा नियम:काही जणांच्या कामात अनेक प्रेरणा असतात, तर काहींच्या कामात स्वार्थ हीच प्रेरणा असते. जे आपण करू तेच पुन्हा आपल्याकडे परत येते. चांगले कराल तर चांगले होईल. हाच जन्म आणि कर्माचा नियम आहे. काही जण मजबूर होऊन अशी कामे करतात, असेही भागवत म्हणाले.
कॅन्सर रुग्ण वाढण्याचा धोका:जगभरासह, देशात दिवसेंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणावर बळावत असून त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. तरीही रुग्णाची शास्वती नसते. या आजाराने अनेक कुटुंब भयभीत होऊन जातात. येणाऱ्या काळात कॅन्सर रुग्णामध्ये वाढ होणार असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. याच अनुषंगाने कॅन्सर रुग्णालये उभारली पाहिजे, असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
रुग्णालयात कोणत्या सुविधा असेल?ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. हे कॅन्सर हॉस्पिटल सर्व सुविधायुक्त असणार आहे. तर सर्व जिल्ह्यातील नव्हे तर अनेक ठिकाणी नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. हे अत्याधुनिक रुग्णालय असून यामध्ये ६०० हून अधिक रुग्ण खाटा असणार आहेत. तसेच कॅन्सर रुग्णांसाठी प्रोटोन थेरपीची चाचणी देखील या रुग्णालयात करण्यात येणार आहे. अत्याधुनिक एक्स-रे, लॅब त्याचबरोबर येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था अल्प दरात देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.