महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Most Wanted Criminal : भोईवाडा पोलिसांनी कुख्यात गुंडाच्या आवळल्या मुसक्या, साथीदारासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

नऊ वर्षांपासून पोलिसांच्या हातात तुरी देऊन फिरणारा कुख्यात गुन्हेगार ( Most Wanted Criminal ) हरिष राकेश सिंग याच्या मुसक्या आवळण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले ( Bhoiwada Police ) आहे. त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आतापर्यंत २१ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असून त्यांपैकी ६ गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याचे समोर आले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Mar 15, 2022, 8:50 PM IST

ठाणे - पोलिसांना आव्हान देऊन गुन्हे करणारा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पिस्तूल व चार जिवंत काडतुसे तसेच लाखोंचे एमडी पावडरसह त्याच्या साथीदारालाही गजाआड करण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले ( Bhoiwada Police ) आहे. विशेष म्हणजे या कुख्यात गुन्हेगारावर मागील ९ वर्षात हत्या, दरोडा, घरफोड्या, चोऱ्या, पोलिसांवर हल्ले अशा गंभीर गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हरिष राकेश सिंग (वय ३० वर्षे, रा. आंबिवली, कल्याण), असे त्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे तर आफताब अन्वर शेख (वय ३५ वर्षे, रा. वालधुनी, कल्याण), असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

सापळा रचून दोन्ही गुन्हेगारांना अटक -भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एम. घुगे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कुख्यात गुन्हेगार हरीष सिंग हा एका साथीदारासह मंगळवारी (दि. १५ मार्च) पहाटेच्या सुमारास वसई-भिवंडी रोडवरील ७२ गाळा या परिसरात अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. ए. इंदलकर व पोलीस निरीक्षक एस. एन. चव्हाण यांनी तत्काळ पोलीस पथकासह ७२ गाळा, भागात सापळा रचला. त्यावेळी हरिष सिंग व आफताब अन्वर शेख दोघांना शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.

७ लाख ८१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत -गुन्हेगारांकडून २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचे पिस्तुलासह ४ जिवंत काडतुसे, एमडी पावडरचा वजन काटा, २७ ग्रॅम ६९० मिली वजनाची १ लाख ३५ हजार रुपयांची सोनसाखळी एक मोबाईल, असा मुद्देमाल जप्त केला तर आरोपी आफताब अन्वर शेख, याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये किंमतीचे ८४ ग्रॅम वजनाची एमडी पावडर आणि २ लाखांची दुचाकी, असा एकूण ७ लाख ८१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

कुख्यात गुंडावर २१ गंभीर गुन्हे -कुख्यात गुन्हेगार हरिष सिंगवर सातारा जिल्ह्यातील एका सरपंचाची हत्या, अंबरनाथ शहरातील सुवर्णकार दुकानदारावर गोळीबार करुन जबरी दरोडा तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून पलायन, मानपाडा व भिवंडी हद्दीत दरोडा व लूट, असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. विशेष म्हणजे हा गुन्हेगार नेहमी जवळ पिस्तूल ठेवून दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आतापर्यंत २१ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असून त्यांपैकी ६ गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याचे समोर आले आहे.

२१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी -या गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेली एमडी पावडर व देशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले तसेच त्याने आणखी किती गुन्हे केले आहेत याचा सखोल तपास भोईवाडा पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -रक्षकच निघाले भक्षक..! 45 लाखांच्या लुटमारीच्या गुन्ह्यात पुण्याच्या तीन पोलिसांसह चौघांना बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details