ठाणे -पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विडीच्या बनावट विडीचा साठा असलेल्या एका गोदामावर भिवंडी पोलिसांनी छापेमारी करीत बनावट विडी विक्रीचा पर्दापाश केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बनावट विडी साठवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करून गोदामातील 7 लाख 92 हजार रुपयांचा विडीचा बनावट साठा जप्त केला आहे. मोहम्मद रियाजउद्दीन निजामउद्दीन शेख (वय 52, रा. नादिया पार , भिवंडी) असे बनावट विडीची साठवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - नागपूर मेट्रो अनावरण सोहळा : विदर्भात लवकरच 'सॅटेलाईट सिटीज्'
पश्चिम बंगालमधील एका प्रसिद्ध विडी कंपनीच्या विडीला भिवंडी शहरात व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आरोपीने गेल्या काही वर्षांपासून भिवंडीतील गैबीनगर येथील एका मजीदच्या लगत आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात बनावट विडी गोदामात साठवणूक करून विक्रीचा व्यवसाय थाटला होता.
रूपा या विडी कंपनीचे व्यवस्थापक रामजीत गुप्ता (वय 47, रा. उल्हासनगर ) यांना आठ दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती कि, गैबीनगर मधील एका गाळ्यात बनावट रूपा विडीचा साठा आहे. त्यानंतर त्यांनी शांतीनगर पोलीस पथकाच्या मदतीने काल (सोमवारी) रात्री साडे दहा वाजत या बनावट विडीच्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी आरोपी मोहम्मद रियाजउद्दीन निजामउद्दीन शेख हा बनावट रूपा विडी विक्रीसाठी तयार असतानाच त्याला गोदामातून ताब्यात घेतले आणि बनावट रूपा विडीचा ७ लाख ९२ हजार रुपयांचा रूपा विडीच्या बनावट साठा केलेल्या ६६ सफेद गोण्या जप्त केल्या आहेत.