ठाणे -भिवंडी शहरातील जैतूनपुरा येथील राहत्या घरात दुकान व खानावळ उघडून त्याद्वारे नशेच्या गोळ्या व घातक शस्त्रे विक्री करत असल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी चार भावांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरी छापा टाकून गावठी पिस्तूल, धारदार सुरे, चाकू व नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. तर यावेळी आरोपींचा वडील फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
नईम खलील मोमीन (३३), नदीम उर्फ आयबा खलील मोमीन(२५), कलीम खलील मोमीन (२६), वसीम खलील मोमीन (२८) (सर्व राहणार, जैतूनपुरा) असे अटक केलेल्या भावांची नावे आहेत. तर या आरोपींचा वडील खलील उर्फ सरदार उर्फ ताजीयावाले मोहम्मद बशीर मोमीन (६३) हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस कारवाई झालेल्या या मोमीन बंधूंची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांनी संगनमताने राहत्या घरात दुकान व खानावळ उघडून त्याद्वारे नशेच्या गोळ्या व घातक शस्त्रे विक्री करीत होते. त्यामुळे जैतूनपुरा भागात या सर्वांची दहशत पसरली होती. या दहशतीमधून नागरिकांची मुक्तता व्हावी, यासाठी स्थानिकांनी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.