ठाणे - भारतात छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शहरातील विविध भागात शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलिसांनी ( Bhiwandi Police ) छापेमारी करून तब्बल 40 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे 10 दिवसांपूर्वीच भिवंडीतील अवनी टेक्सटाईल्समध्ये काम करणाऱ्या 9 बांग्लादेशी नागरिकांना कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यामुळे भिवंडी व आसपासच्या भागात आणखीही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची शक्यता असल्याने ठाणे व मुंबई जिल्ह्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
खबऱ्यामुळे बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश...
शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलीस पथकला बांगलादेशी नागरिक भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून हावडा रेल्वे स्टेशन येथे येवून रेल्वेने प्रथम कल्याण व नंतर भिवंडीत अनधिकृतपणे वास्तव्यास राहून भिवंडीच्या विविध भागात असल्याची खबर दिली. त्यांनतर तिन्ही पोलीस ठाण्याच्या पथकाने विविध ठिकाणी छापेमारी केली असता 40 बांग्लादेशी नागरिक आढळून आले आहे. या दरम्यान या 40 जणांनी बनावट पॅन कार्ड व आधार कार्ड तसेच पोस्ट ऑफिसचे पासबूक मिळवून ते शासनास खरे असल्याचे भासवून सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले आहे.