महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडी महापालिकेत महिला महापौर आरक्षणामुळे सत्ता समीकरणांना वेग ; आर्थिक घोडेबाजार रंगणार ! - Bhiwandi Municipal Mayor Election

भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचे महापौर पद खुल्या गटातील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यामुळे महापालिकेत सत्ता समीकरणांना वेग आला आहे.

भिवंडी महापालिका

By

Published : Nov 15, 2019, 10:38 AM IST

ठाणे -भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचे महापौर पद खुल्या गटातील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व शिवसेना आघाडीतील नगरसेवक सक्रिय झाले आहेत. त्यासोबतच सत्ताधारी पक्षाला शहदेण्यासाठी कोणार्क विकास आघाडी व भाजप पक्षाचे नगरसेवक देखील महापौर पद मिळविण्यासाठी सतर्क झाले आहेत. गुरुवारी दुपारी गटागटातील नगरसेवकांनी महापौर पदासाठी बैठका घेऊन चर्चा सुरु केली आहे. महापौर पद महिला आरक्षण असल्यामुळे भिवंडीत महापौर पदाची स्वप्ने पाहणाऱ्या दिग्गज नरसेवकांचा हिरमोड झाला आहे.

भिवंडी महापालिका

येत्या ९ डिसेंबरला काँग्रेसचे महापौर जावेद दळवी यांच्या पदाची मुदत संपत आहे. त्यामुळे आपल्या पक्षाच्या मर्जीतील महिला उमेदवारांच्या चाचपणीसाठी त्यांनी राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांशी सपंर्क करून मोहीम सुरू केली आहे. या महापौर पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी देखील वाढण्यास सुरवात झाली आहे.

भिवंडी पालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून काँग्रेस व शिवसेना आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत ९० नगरसेवक असून काँग्रेसचे ४७ नगरसेवक तर शिवसेनेचे १२ नगरसेवक अशा ५९ नगरसेवकांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेस पक्षाला बहुमत असताना देखील एक गट फुटून भाजप व कोणार्क विकास आघाडीला जाऊन मिळेल या भीतीने त्यांनी शिवसेनेला सोबत घेऊन पालिकेची सत्ता हाती घेतली आहे. काँग्रेसचे जावेद दळवी हे पालिकेचे विद्यमान महापौर आहेत, तर शिवसेनेचे मनोज काटेकर हे उपमहापौर आहे. भाजपने अपक्षांची आघाडी तयार करून विरोधी पक्ष निर्माण केला आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षात विरोधी पक्षाला डोके वर काढू न देता सत्ताधारी पक्षाने विरोधकांना कमकुवत केले आहे. त्यामुळे नगरसेवक कॉग्रेससोबत समाधानी असल्याचे दिसत आहे.

शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था, घाणीचे साम्राज्य, डेंग्यू, मलेरिया, टॉयफाईड या सारख्या आजाराची वारंवार उद्भवणारी साथ अशा विविध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. सत्ताधारी काँग्रेस व शिवसेना महाशिव आघाडीविरोधात नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवणुकीत जनतेने काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. महापौर पदाच्या आरक्षणात भिवंडी पालिकेत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे आता महिला नगरसेविकांना पुढे करत महापौर पदासाठी राजकीय गणिते मांडण्याचे डाव भाजप व काँग्रेस पक्षांनी महानगर पालिकेत सुरु केले आहे. कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका तथा माजी महापौर प्रतिभा विलास पाटील, काँग्रेस गटातून माजी उपमहापौर मिस्बाह इम्रान खान, रिषीका प्रदीप राका, वैशाली मनोज म्हात्रे तर भाजपमधून अस्मिता चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महापौर पदाच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने नगरसेवक आनंदी दिसत आहेत. जो जास्त खर्च करेल त्यालाच महापौर पद मिळेल अशी उघडउघड चर्चा महापालिका वर्तुळात सुरु झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details