ठाणे - भिवंडी शहर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. यात शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी दाखल केले. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांच्या गटात उभी फूट पडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे सध्या महापालिकेत शिवसेना, काँग्रेस आघाडीची सत्ता आहे.
भिवंडी महापालिका महापौर निवडणूक तर कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास आर.पाटील यांनी त्यांच्या पत्नी असलेल्या माजी महापौर प्रतिभा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली आहे. काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांचा एक मोठा गट प्रतिभा पाटील यांच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या गटात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी महापौर पदासाठी 4 उमेदवारांनी एकूण ७ तर उपमहापौर पदासाठी सात जणांनी ९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा -गांधी परिवाराची 'एसपीजी' सुरक्षा काढल्यावरून 'सामना'तून शाहांवर निशाणा
महापालिकेत ९० नगरसेवक आहेत. त्यामध्ये काँग्रेस ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्क विकास आघाडी ९, समाजवादी पार्टी २ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत काँग्रेस-शिवसेना आघाडीची सत्ता आहे. सध्या महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर आहेत. महापौर आणि उपमहापौर यांच्या पदाची मुदत ९ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी शासन निर्देशानुसार महापौरपदासाठी येत्या ५ डिसेंबर रोजी पालिका सभागृहात निवडणूक होणार आहे.
हेही वाचा -हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत
आज (शनिवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये काँग्रेसतर्फे रसिका प्रदीप राका, वैशाली मनोज म्हात्रे, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील, शिवसेनेच्या वंदना मनोज काटेकर यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसतर्फे इमरान वली मोहम्मद खान, राबिया मकबूल हसन, तलाह मोमीन, मुख्तार मो. अली खान, शिवसेना-बाळाराम चौधरी, मदन (बुवा) नाईक, संजय म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव अनिल प्रधान यांच्याकडे दाखल केले आहेत.
भिवंडी पालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून काँग्रेस-शिवसेना आघाडीची सत्ता आहे. तर भाजप-कोणार्क विकास आघाडी ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. शिवसेनेने आता महापौरपदासाठी आपला दावा दाखवला आहे. त्यामुळे काँग्रेस गोटात खळबळ माजली आहे. मात्र, तरी महापौर जावेद दळवी यांनी काँग्रेसच्यावतीने शक्ती प्रदर्शन करीत नगरसेविका रसिका पप्पू राका यांचा अर्ज दाखल केला आहे. तर कोणार्क विकास आघाडीने विरोधी पक्षातर्फे अर्ज दाखल करून नगरसेवकांची पळवापळवी सुरु केली आहे. दुसरीकडे बहुमताच्या आकड्यासाठी लागणाऱ्या नगसेवकांची खरेदी-विक्रीही गेल्या आठवड्यापासून सुरु आहे. काही नगरसेवकांना पहिला ५ लाखांचा हफ्ता पोहचल्याचे बोलले जात आहे.