ठाणे - कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पडघा येथील सभेत काँग्रेसचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश टावरेंवर गद्दार असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना टावरेंनी पाटील हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे, असे वक्तव्य केले.
पाटील हे पूर्वाश्रमीचे आरएसएसचे सदस्य आणि त्यानंतर २५ वर्षे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. सर्व पक्ष फिरुन झाल्यावर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांचा योग्य तो सन्मान राखत उमेदवारी दिली. त्यामुळे आता त्यांच्या या बंडखोरीमुळे गद्दार कोण? हे सर्वांसमोर आले आहे, असे टावरे म्हणाले.
भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने टावरे यांना उमेदवारी जाहीर करताच कुणबी सेना प्रमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले. भिवंडी लोकसभा क्षेत्रात अल्पसंख्याक मतांचे प्रमाण भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात लक्षणीय असल्याने काँग्रेसने माजी खासदार टावरेंना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर केली.
पाटील यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, यावेळी त्यांना तिकीट नाकारले गेले. त्यानंतर त्यांनी पडघा येथील कुणबी समाजाच्या सभेत बंडाचे निशाण फडकवीत माजी खासदार सुरेश टावरे हे गद्दार असल्याची टीका केली. त्यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेस उमेदवार टावरे यांना विचारणा केली असता राहुल गांधी यांनी माझी उमेदवारी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदाच्या निवडणुकीत पक्षाला हमखास यश मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.