ठाणे : भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 41 जणांचा बळी गेला असून, 25 जखमींना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही किमान 15 ते 20 जण अडकून पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफ, टिडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनच्या तुकड्या घटनास्थळी बचावकार्य करीत असून, मंगळवारपासून जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने येथील ढिगारा हलविण्याचे काम सुरु झाले आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही इमारत कोसळली होती.
या इमारत दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना सोमवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर केली होती. तर, मंगळवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून अधिक 4 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी ही इमारत अधिकृत असल्याची पडताळणी केल्यानंतर ही मदत दिली जाणार आहे. तसेच, वडेट्टीवारांनी जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. ही इमारत जुनी असल्याने या दुर्घटनेस नेमकी कोण जबाबदार आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करीत करण्यात येईल तसेच शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेणे गरजेचे असून वाढीव चटई क्षेत्र मंजूर करणे, पुनर्वसनाची व्यवस्था करणे याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती याप्रसंगी वडेट्टीवार यांनी दिली.