ठाणे Bhivandi Crime News : तरुण विवाहितेचा बळजबरीने गर्भपात करून तिला ठार मारण्यासाठी विषारी औषध देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील कामतघर परिसरात घडलीय. याप्रकरणी पीडित विवाहितेनं पतीसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पती सागर प्रकाश पाटील, आशा उर्फ योगिता योगेश पाटील, गोपाळ प्रकाश पाटील, गांगलबाई प्रकाश पाटील, प्रकाश तुळशीराम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. तर दीपाली सागर पाटील (वय २१) असं पीडित विवाहितेचं नाव आहे.
विवाहितेने दिली तक्रार : याप्रकरणी नारपोली (narpoli police news) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात राहणारी असून तिचा विवाह २०२१ मध्ये भिवंडीत राहणाऱ्या सागर याच्याशी झाला. धक्कादायक बाब म्हणजे विवाह झाल्यानंतर पीडिता सासरी आल्यानंतर काही महिन्यातच गभर्वती राहिली होती. मात्र ८ मे ते १६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पीडिता सासरी राहत असतानाच, पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होत होते. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन पती पत्नीच्या भांडणातून सासरच्या मंडळीने बेकायदेशीर रित्या विवाहितेचा बळजबरीने गर्भपात केला. त्यानंतर तिला ठार मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हंटलय. दरम्यान पीडित विवाहितेचे आईवडील तिला माहेरी घेऊन गेले होते. त्यानंतर तिच्यावर घडलेला प्रसंग तिने घरच्यांना सांगताच त्यांनी पीडितेला घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस (malkapur police) ठाण्यात जून २०२१ रोजी पतीसह ५ जणांच्या विरोधात तक्रार दिली होती. मात्र या खटल्यावर बुलडाण्यातील न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सदरची घटना भिवंडीत घडल्याने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश दिले होते.