ठाणे- एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असतानाही काही जण सर्रासपणे या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहेत. मात्र, कल्याणातील एका जोडप्याचे करावे तितके कौतूक कमीच आहे. या जोडप्याने घरातल्या घरात विवाह सोहळा पार पाडत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
हेही वाचा -धक्कादायक! चिकन खायला मागणे बेतले जीवावर.. मित्राने चाकू भोकसून केली हत्या
रुपेश भास्कर जाधव आणि प्रियांका जाधव अशी या नववधू वराची नावं आहेत. रुपेश कल्याण न्यायालयात वकिली करत आहे. तर प्रियांका एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. घरच्या मंडळींसोबत विवाह करण्यासोबतच या दोघांनी विवाहाच्या विधीदरम्यान तोंडाला मास्क बांधून आणि सॅनिटायजरने आपले हात स्वच्छ धुवून लोकांना स्वच्छतेचा संदेशही दिला आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रात त्याचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अशावेळी गर्दी जमा होईल अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन किंवा विवाह समारंभ पुढे ढकलण्याचे शासनाने आवाहन केले आहे. परंतु, अनेक ठिकाणी या आवाहनाला लोकांकडूनच हरताळ फासत भव्य-दिव्यतेने विवाह सोहळे साजरे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे रुपेश आणि प्रियांका या दोघांनी मिळून त्यांच्या विवाहाबाबत घेतलेल्या निर्णयाचे इतरांनीही अनुकरण केले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -गॅस सिलेंडरच्या गळतीने घराला आग, आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक