ठाणे -राज्यात कोरोना रुग्ण कमी झाले आहेत तरीदेखील बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच राज्य शासनाच्या वतीने ठाणे जिल्ह्यासह १८ जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पाहता याठिकाणी मागील वेळी सर्वाधिक रुग्ण कोरोनाबाधित झाले होते तेव्हा ठाण्यातील रुग्णालयात बेड मिळणेदेखील मुश्किल झाले होते. ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि प्रशासनाची बेडची जुळवा जुळव सुरुच आहे. असे असताना आता होम आयसोलेशन बंद करण्यात आल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या अचानक वाढल्यास काय करायचे? असा पेच आतापासून सतावू लागला आहे. त्यासोबत जिल्हा प्रशासन आता राज्य सरकारच्या आदेशाच्या पालनासाठी तयार होत आहे.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मात्र, या लाटेमध्ये रुग्णांना मागील महिन्यात बेड मिळणेदेखील कठीण झाले होते. मात्र, एकीकडे ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत ती आता कमी होऊ लागली आहे. दरम्यान, संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एकूण होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या 64 लाख 26 हजार 445 इतकी आहे. त्यापैकी पाच लाख 11 हजार 896 इतके रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी आता 1953 जण ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 9001 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासन तयार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत 37 लाख 48 हजार 199 रुग्ण विलगीकरणात आहेत. त्यापैकी 12 हजार 903 हे त्यांच्या स्वतःच्या घरीच विलगीकरणात आहेत. 16 लाख 20 हजार 835 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 लाख 81 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1898 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1791 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नऊ लाख 50 हजार 501 नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 97 हजार 476 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर 15609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 18 लाख 16 हजार 151 नागरिक विलगीकरण कक्षात आहेत. त्यापैकी 87 हजार 987 बाधित रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. सध्या 1771 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत सात लाख 44 हजार 70 लोकांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 32 हजार आठ रुग्ण कोरोना बाधित आहेत. 56 हजार 763 रुग्णांना गृह विलगीकरणात आहेत. त्यापैकी 19 हजार 247 जण स्वतःच्या घरीच विलगीकरणात आहेत. सध्या 2740 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.