ठाणेBangladeshis Arrested In Bhiwandi: जिल्ह्यातील भिवंडी शहर परिसरात बनावट शिधापत्रिका बनवणारे काही संशयित राहत असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र एटीएसच्या ठाणे युनिटनं सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतलं. खळबळजनक बाब म्हणजे, अटक आरोपींमध्ये नौशाद हा सरकारी रेशन दुकान चालवतो. इतर दोन अटक आरोपी बनावट कागदपत्रं बनवून नागरिकांना रेशन कार्ड मिळवून देण्यास मदत करत असल्याचा आरोप आहे.
- 8 हजारात रेशनकार्ड: आरोपी बांगलादेशातील नागरिकांसाठी भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी लोकांकडून पैसे घेत आणि त्यांना बनावट रेशन कार्ड देत होते. जेणेकरून त्यांची ओळख जाहीर होऊ नये. हे राशन कार्ड 8 हजार रुपयात बनवून देत होते अशी माहिती आहे. या प्रकरणात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास व कारवाई स्थानिक पोलीस करत आहेत.
बांगलादेश टू भिवंडी, व्हाया पश्चिम बंगाल:देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी नागरिकांनी भारतात येण्यासाठी आवश्यक पारपत्र व परवाना तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचं आहे. मात्र, या सर्व शासकीय नियमांना बगल देऊन केवळ दलालाच्या मध्यस्थीने छुप्या व अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात येतात. यानंतर याच दलालांच्या मदतीने पुढे भारतातील विविध कानाकोपऱ्यात वास्तव्य करतात. कामाच्या शोधात आलेले हे बांगलादेशी नागरिक बहुतेक करून राज्यातील मुस्लिम बहुल भागांमध्ये राहतात.
दलाल घेतात 7 ते 8 हजार रुपये:भिवंडीत अवैध राहत असलेले बांगलादेशी नागरिक दलालाला 7 ते 8 हजार रुपये देऊन भारतात येतात. हेच दलाल त्यांच्यासाठी भारतातील पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर बोगस कागदपत्र तयार करून देतात. तर बारमध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी तरुणींकडून १० ते १५ हजार रुपये हे दलाल घेत असतात. भिवंडी या संवेदनशील व कामगार नगरीत देखील अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. अवजड काम तसेच बांधकाम क्षेत्रात मजुरी, डाइंग सायजिंगमध्ये बॉयलर अटेंडंट व प्लंबिंगचे काम करून भिवंडीतील अनेक ठिकाणी चाळींमध्ये हे नागरिक आपली ओळख लपवून राहतात.
पश्चिम बंगालच्या सीमेवरून भारतात प्रवेश:बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिमबहुल राष्ट्र आहे. तर भारतातील पश्चिम बंगालच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये बोलली जाणारी बोली भाषा बांगलादेशी नागरिकांसारखीच आहे. अनेक बांगलादेशी नागरिकांचे नातेवाईक देखील या सीमे लगतच्या गावांमध्ये राहत असल्याने या गावांमधूनच हे नागरिक भारतात येत असतात. अटक केलेले हे बांगलादेशी नागरिक देशविघातक कृत्याशी संबंधित नसतात. केवळ रोजगाराच्या शोधातच ते शहरात आल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. तरीही बेकायदेशीररीत्या शहरात राहणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे यापुढेही शहरात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया एटीएसच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- Bangladeshi Arrested In Kalyan : कल्याण एसटी डेपो परिसरातून ५ बांगलादेशी महिलांसह भारतीय नागरिकालाही अटक
- Mumbai Crime : अवैधरित्या मुंबईत वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकास अटक
- Five Bangladeshi Arrested : बनावट कागदपत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक